‘कुछ अलगसी,फॅमिलीवाली फीलिंग’ हे ब्रीद डोळयासमोर ठेवून ‘फोर्ड’ गेली काही वर्षे भारतात कार निर्मिती करीत होते. फोर्ड इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनुराग मल्होत्रा यांनी अचानक भारतात व्यवसायाची पुनर्रचना करीत असल्याचे सांगत भारतातील दोन्ही कार उत्पादन कारखाने बंद करीत असल्याची घोषणा केली. निर्मिती बंद करीत असलो तरी सेवा कायम राहणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. मात्र परवडणाऱ्या कारच कंपनी बाजारात आणणार नाही तर सेवा काय देणार? त्या ‘फॅमिलीवाली फीलिंग’चे काय? असे प्रश्न फोर्डच्या चाहत्यांनी उपस्थित केले आहेत.

बापू बैलकर

फोर्ड ही जगातील सर्वात जुन्या वाहननिर्माता कंपन्यांपैकी एक आहे. जगातील प्रमुख पाच कारनिर्मात्यांत या कंपनीचा समावेश आहे. ९० च्या दशकात कंपनीने भारतात आपला व्यवसाय सुरू केला. पहिला प्रकल्प चेन्नई आणि दुसरा प्रकल्प गुजरात सानंद येथे उभारला. हे दोन्ही प्रकल्प कंपनी बंद करीत आहे. डिसेंबपर्यंत सानंद प्रकल्प तर जूनपर्यंत चेन्नई प्रकल्प बंद केला जाईल. हे दोन्ही प्रकल्प बंद होणार म्हणजे कंपनी भारतातून आपला व्यवसाय पूर्ण बंद करणार आहे असे नाही. तेथील कारची निर्मिती बंद करणार असून सेवा मात्र सुरूच ठेवणार आहे. कार आयात करून त्या भारतात विक्री करणार आहे. सानंद प्रकल्पात ५०० कर्मचारी इंजिन बनविण्याचे काम सुरू ठेवतील असे कंपनीने जाहीर केले आहे. यामुळे फोर्डच्या भारतात निर्मिती होत असलेल्या फिगो, अ‍ॅस्पायर, फ्री स्टाईल, इको स्पोर्ट या कारचे उत्पादन बंद होणार आहे. म्हणजे फोर्ड आता यापुढे परवडणाऱ्या कार ग्राहकांना देणार नाही, हे स्पष्ट होते. फोर्ड भारतात यापुढे फक्त महागडय़ा कार विकणार आहे. त्यामुळे फोर्ड ग्राहकांच्या भावना दुखावल्या आहेत. गेली अनेक वर्षे ‘कुछ अलगसी फॅमिलीवाली फीलिंग’ असे म्हणत कंपनीने आपली फसवणूक केल्याच्या भावनाही त्यांच्या आहेत.

कंपनीने नुकतेच रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या ग्राहकांना शुभेच्छा संदेश देताना ही फॅमिलीवाली फीलिंग व्यक्त करीत सेप्टी, लव्ह, कम्फर्ट, हॅप्पीनेस आणि सेलिब्रेशन ही कौटुंबिक भावनांची प्रमुख सूत्र असल्याचे म्हटले होते. यावर काही ग्राहकांनी त्यांच्या सेवेबाबत निराशा व्यक्त केली होती. पंकज बामोरिया यांनी ‘फोर्ड एस्पायर’ मी खरेदी केली असून काळजी घेत आतापर्यंत चालवली. ४ हजार किलोमीटर इतकीच कार चालली असून चार महिन्यातच कारचे इंजिन बिघडले. इतर समस्याही निर्माण झाल्या. मला इंजिन नवीन बदलण्याचा सल्ला देण्यात आला. यासाठी मला १ लाखांपेक्षा अधिक खर्च आहे. दोन महिन्यांपासून फोर्डशी संपर्क करीत आहे. २० व्या दिवशी त्यांच्या मध्यस्थीने संपर्क करीत तुमच्या होणाऱ्या खर्चात ५० टक्के सूट देऊ असे सांगितले. मात्र त्याबाबत अद्याप काही झालेले नाही. मला कार आवडते,

मात्र सेवा दिली जात नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवीन कारमध्ये या समस्या निर्माण झाल्या असतील तर माझ्या कार घेण्याच्या आनंदाचे काय झाले असेल असा सवालही त्यांनी केला आहे. बामोरिया यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया ही बोलकी आहे. ‘फोर्ड’ने काही दिवसांपासून बाजारात नवीन काही आणले नाही. त्यांची सुधारित येणारी कारही बाजारात आली नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून फोर्ड या बदलाची तयारी करीत होती का?  असाही प्रश्न विचारला जात आहे.

फोर्ड फिगो : फोर्ड फिगोचे सध्याचे व्हेरिएंट शेवटचे २०१९ मध्ये अपडेट केले गेले. या कारची किंमत ६.६३ लाख रुपयांपासून सुरू  होते आणि ९.५६ लाख रुपयांपर्यंत जाते. या कारची सुधारित आवृत्ती येण्याची चर्चा सुरू होती.

फोर्ड आयकॉन : १९९९  मध्ये फोर्डने विकसित केलेली मध्यम आकारातील कार. सुरुवातीला फोर्डने फिएस्टा हॅचबॅकचे सेडान व्हेरिएंट म्हणून सादर केले होते. फोर्ड आयकॉन ही ५ आसनी सेडान असून या कारची किंमत ४.९७ ते ५.५९ लाख रुपये इतकी होती. कंपनीने या कारचे उत्पादन थांबवले होते.

फोर्ड इकोस्पोर्ट : फोर्डच्या भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक कार. मध्यम आकारातील ही एसयूव्ही २०१३ मध्ये बाजारात आली. या कारची किंमत ८.१९ ते ११.६९ लाख आहे. ही कार ११ प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

फोर्ड फिएस्टा : पाच आसनी असलेल्या फिएस्टाचे उत्पादन आता बंद आहे. या कारची किंमत ८.६३ ते १०.३१ लाख दरम्यान आहे.

फोर्ड एन्डेव्हर :  ही कार लोकप्रिय एसयूव्ही आहे. २००३ मध्ये बाजारात दाखल झालेल्या मोठय़ा एसयूव्हीपैकी एक एन्डेव्हर होती. फोर्ड एन्डेव्हरची किंमत ३९.०६ ते ४१.८४ लाख इतकी आहे.

फोर्डच्या लोकप्रिय कार

फोर्ड भारतात चांगले मार्केट तयार करण्यात जरी अपयशी ठरली असली तरी या कंपनीच्या काही कारला देशात चांगली मागणी आहे. फोर्डच्या या परवडणाऱ्या कार घेणाऱ्या ग्राहकांची संख्याही खूप मोठी आहे. मागणी असलेल्या फोर्डच्या कार कोणत्या त्या पाहू.

‘भारतीय बाजाराला दोष देणे चुकीचे’

भारतात एमजी आणि किया या दोन कंपन्या नव्याने आल्या असतानाही नवनवीन पर्याय बाजारात देत आहेत. त्यांच्या कारला मोठी मागणी आहे. ग्राहकांच्या बदलत्या कलानुसार फोर्डने नवे पर्याय दिले नाहीत आणि आता ते भारतीय बाजारात मागणी नसल्याचे कारण देत आहेत. हे चुकीचे आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असलेली एसयूव्ही

‘अ‍ॅस्टर’

ऑटोनॉमस (लेव्हल २) तंत्रज्ञानासह भारतातील पहिली एसयूव्ही

एमजी मोटर इंडियाने वैयक्तिक कृत्रिम बुद्धिमत्ता साहाय्यक असलेली आणि ऑटोनॉमस हे तंत्रज्ञानाने तयार केलेली पहिली एसयूव्ही कार एमजी अ‍ॅस्टर बाजारात दाखल झाली आहे. अनेक प्रकारच्या तंत्रज्ञान सुविधा या कारमध्ये देण्यात आली आहे.

एमजी अ‍ॅस्टरच्या वैयक्तिक एआय असिस्टंटमध्ये मानवासारख्या भावना आणि आवाजाची वैशिष्टय़े जोडली आहेत. पॅरालिम्पिक अ‍ॅथलिट दीपा मलिकने वैयक्तिक एआय साहाय्यकाला आपला आवाज दिला आहे.

या कारमध्ये सॉफ्ट-टच आणि प्रीमियम मटेरियलसह इंटिरिअर करण्यात आले आहे.  दोन इंजिन पर्याय आहेत. एक ब्रिट डायनॅमिक २२० टबरे पेट्रोल इंजिन ज्यात ६-स्पीड एटी आहे जे तब्बल २२० एनएम टॉर्क आणि १४० पीएस पॉवर देते आणि दुसरे – मॅन्युअल ट्रान्समिशनसह व्हीटीआय टेक पेट्रोल इंजिन आणि ८-स्पीड सीव्हीटी, १४४ एनएम टॉर्क आणि ११० पीएस पॉवर देते.

एआय तंत्रज्ञान, सहा रडार आणि पाच कॅमेरे एसयूव्हीला १४ प्रगत ऑटोनॉमस लेव्हल २ वैशिष्टय़े आहेत.   सुरक्षा वैशिष्टय़ांमध्ये ६ एअरबॅग्स, ६-वे पॉवर-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, गरम ओआरव्हीएम, रेन-सेन्सिंग वायपर, पीएम २.५ फिल्टर, पॅनोरॅमिक स्काय रूफ, रिअर एसी व्हेंट आणि फ्रंट आणि रिअर आर्मरेस्ट, १०.१ इंच एचडी इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ७ इंच एम्बेडेड एलसीडी स्क्रीनसह पूर्ण डिजिटल क्लस्टर यांचा समावेश आहे.

एस्टरमध्ये एमजी आय-स्मार्ट तंत्रज्ञानावरील ८०+ इंटरनेट वैशिष्टय़े आहेत. त्याच्या वर, सीएएपी (कार एज ए प्लॅटफॉर्म) आहे, एमजी अ‍ॅस्टर सबस्क्रिप्शन आणि सेवा आयोजित करते, ज्यात मॅपमायइंडियासह नकाशे आणि नेव्हिगेशन, जिओ कनेक्टिव्हिटी अशा प्रकारचे पहिले ब्लॉकचेन-संरक्षित वाहन डिजिटल पासपोर्ट समाविष्ट आहे.