गर्भावस्थेत असणाऱ्या महिलेच्या रोग प्रतिकारकशक्तीवर गर्भाच्या लिंगाचा प्रभाव पडत असल्याचे नव्या अभ्यासात दिसून आले आहे. ज्या महिलांच्या गर्भाशयामध्ये मुलीचा गर्भ आढळून आला त्यांच्यामध्ये मोठय़ा प्रमाणात दाहक प्रतिसाद शास्त्रज्ञांना दिसून आला.

अमेरिकेतील ‘द ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटी’च्या संशोधकांनी ८० गर्भवती महिलांचा अभ्यास केला. यामध्ये त्यांची गर्भधारणा आणि गर्भाशयामध्ये असणाऱ्या गर्भाचा महिलेच्या रोगप्रतिकारक शक्तीवर विविध पातळ्यांवर कोणत्या प्रकारे परिणाम होतो, याचा यामध्ये अभ्यास करण्यात आला.

रक्तातील सायटोकिन्स पातळी आणि रोगप्रतिकारक शक्ती याबाबत प्रयोगशाळेत विश्लेषण करण्यात आले. महिलांच्या रक्तातील सायटोकिन्स पातळीवर गर्भाच्या लिंगाचा प्रथम पातळीवर कोणताही फरक दिसून आला नाही. मात्र ज्यावेळी मुलीचा गर्भ महिलेच्या गर्भाशयामध्ये वाढीस लागतो त्यावेळी महिलेच्या रक्तातील दाहकसायटोकिन्समध्ये वाढ होते. यामुळे महिलेच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आल्याचे द ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले.

या अभ्यासानुसार, गर्भाशयामध्ये मुलाच्या गर्भाच्या तुलनेत मुलीचा गर्भ राहिल्याने महिलेच्या प्रतिकारक शक्तीमध्ये अधिक वाढ होत असल्याचे दिसून आले. सध्या यामध्ये अधिक संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचे अमांडा मिशेल यांनी म्हटले आहे. हे संशोधन ब्रेन, बिहेवियर आणि इम्युनिटी या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.