तापावरील लस सकाळच्या वेळेत रुग्णाला दिल्यास ती अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरते, असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे.
संशोधकांनी लंडनमधील शीतज्वर लसीकरण कार्यक्रमात २०११ आणि २०१३ या काळातील २४ अभ्यासांचे विश्लेषण केले आहे. त्यात ६५ वर्षांवरील २७६ व्यक्तींना तीन वेगवेगळ्या तापांसाठी सकाळी ९ ते ११ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत लस देण्यात आली. यापैकी दोन प्रकारांचा ताप असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत गतीने सुधारणा झाली, तर दुपारी लस देण्यात आलेल्या रुग्णांच्या प्रकृतीतील सुधारणेची गती कमी होती, असे संशोधकांनी म्हटले आहे. तिसऱ्या प्रकारचा ताप असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत कोणताही विशेष फरक जाणवला नाही.
प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीत सतत चढ-उतार होत असतात. त्यामुळे लसीकरणानंतर रुग्णाच्या प्रकृतीतील बदल सातत्याने तपासण्याची गरज असते, असे बर्मिगहॅम विद्यापीठाच्या अ‍ॅना फिलिप्स यांनी सांगितले. सकाळच्या वेळी देण्यात आलेल्या लसीमुळे रुग्णाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या संशोधनामुळे लसीकरणात आणखी कोणते बदल करावेत यासाठी नव्या कल्पना मिळाल्या, असेही फिलिप्स यांना स्पष्ट केले. शीतज्वरामुळे दरवर्षी अडीच ते पाच लाख रुग्णांचा मृत्यू होतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. तापाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रत्येक वर्षी मोठय़ा प्रमाणात खर्च करण्यात येतो. प्रौढ व्यक्तींना याचा संसर्ग लगेच होतो, असे बर्मिगहॅम विद्यापीठाचे संशोधक जानेत लॉर्ड यांनी सांगितले.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)