बॉलिवूडमध्ये ‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’ सारखे चित्रपट देऊन आपली वेगळी ओळख निर्माण करणारे मराठमोळे दिग्दर्शक निशीकांत कामत यांचे आज हैदराबादमधील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. निशिकांत यांना मागील दोन वर्षांपासून लिव्हर सिरॉसिसचा त्रास होता, असं रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे. हेच दुखणं पुन्हा एकदा बळावल्यामुळे मागील काही दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र दुपारी चार वाजून २५ मिनिटांनी निशिकांत यांची प्राणज्योत मालवली. ते ५० वर्षांचे होते. मात्र लिव्हर सिरॉसिसमुळे त्यांचा मृत्यू झाला हा नक्की कशामुळे होतो ? त्याची लक्षण काय आहेत ? हे अनेकांना ठाऊक नसतं. याचंसंदर्भात आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत.

पूर्वी लिव्हर सिरॉसिस अतिमद्यपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये प्रामुख्याने होत असे. परंतु आज ५० टक्के रुग्णांना हिपाटायटीस बी, सी आणि ई किंवा यकृतातील चरबी (Fatty liver grade 3-4, Non Alcoholic Steato Hepatitis)  ह्यपैकी एक आजार असतो. बदलत्या जीवनशैलीमुळे मद्यपान न करणाऱ्या व्यक्तीनाही हा आजार होऊ शकतो.

लिव्हर सिरॉसिस म्हणजे लिव्हर अर्थात आपलं यकृत याचं पूर्णपणे (Destruction) विघटन होऊन अत्यंत घट्ट झालेले यकृत. यामध्ये लिव्हर बहुतांशी खराब होऊन नष्ट झालेले असते व त्याची जागा Fibrous bands म्हणजेच तंतूंनी घेतलेली असते. लिव्हर कडक झालेली असते, त्याचा आकारही अगदी लहान झालेला असतो. यकृत हे आपल्या शरीरात चयापचयासाठी खूप उपयोगी व आवश्यक असते. यकृताच्या कोणत्याही आजारात शरीरातील प्रथिने, चरबी व कबरेदके यांचे प्रमाण व चयापचय बाधित होते. लिव्हर सिरॉसिस झाल्यामुळे यकृताचे काम मंदावते व शरीरावर विविध परिणाम होतात.

सिरॉसिसची कारणं अनेक असू शकतात. त्यापैकी काही प्रमुख कारणं खालीलप्रमाणे

१) सतत दारू पिणे – (Alcoholic Cirrhosis) – अतिमद्यपान केल्याने यकृतामध्ये सूज येऊन सिरॉसिस होतो.

२) यकृतातील चरबीचे प्रमाण अति होणे- (NASH-  Non Alcoholic Steato Hepatitis) – ग्रेड ३ व ४

३) Hepatitis B & C उ हा काविळीचा आजार- रक्तदान करताना हे व्हायरस तपासणे आवश्यक असते. एखाद्या शस्त्रक्रियेदरम्यान किंवा इतर कारणांमुळे रुग्णास रक्त द्यावे लागले तर त्या रक्तामधून बी किंवा सी वायरसचे यकृतामध्ये संक्रमण होऊ शकते. तसेच इंजेक्शन घेताना नेहमी सुई नवीन वापरावी. नाहीतर वरील संसर्ग होण्याची शक्यता असते.

४) काही औषधे (Methotrexamte, Nicotinic Acid) अति काळ सेवन केल्याने सिरॉसिस होऊ शकतो.

५) जन्मजात लिव्हरमधील दोष- Wilson disease किंवा पित्त नलिकेत जन्मजात अडथळा असेल तर सिरॉसिस होऊ शकतो.

६) काही वेळा सिरॉसिसचे कोणतेही कारण मिळत नाही cryptogenic). या रुग्णामध्ये एएनए (anti nuclear antibodies) positive असू शकतात.

लिव्हर सिरॉसिसची लक्षणं कोणती :

१) या आजारामध्ये प्रथम लिव्हरच्या पेशी फुटतात, त्यांचे कार्य मंदावते व हळूहळू त्या नष्ट होतात. त्याची जागा भरून येते Fibrous तंतूंनी, जे काहीच कामाचे नसतात. त्यामुळे लिव्हरचे व यकृताचे काम हळूहळू कमी होऊ लागते.

२) सुरुवातीस वजन कमी होणे व थकवा जाणवणे अशा प्रकारची लक्षणे दिसतात. पण आजार वाढू लागल्यावर कावीळ होणे, पोटात पाणी होणे (जलोदर), पायाला सूज येणे अशी लक्षणे दिसतात. या आजारात रुग्णास वारंवार जुलाब तसेच अपचन होते. पोटाच्या उजव्या बाजूस दुखते व भूकही मंदावते.

३) यकृत घट्ट झाल्यामुळे यकृतातील रक्त प्रवाह कमी होतो व पोटातील अन्नसंस्थेतील नीलामध्ये (Portal Hypertension) रक्तदाब वाढतो. त्यामुळे रुग्णास अन्ननलिकेतून रक्तस्राव होऊ शकतो. अशा वेळी दुर्बिणीतून उपचार करून हा रक्तस्राव थांबवता येतो.
त्या व्यक्तीला कावीळ होऊ लागते, अपचनाचा त्रास होऊ लागतो, भ्रम होतो (रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो) व सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे रक्ताच्या उलटय़ा होऊ लागतात.

४) या आजाराचे निदान विविध रक्ततपासण्या, सोनोग्राफी व सी.टी. स्कॅन करून करता येते. विविध रक्ततपासण्या करून सिरोसीस ग्रेड ए, बी किंवा सी (Childs grades) मध्ये त्याचे वर्गीकरण केले जाते. ए ग्रेड हा सुरुवातीचा तर सी ग्रेड हा शेवटच्या टप्प्यातील आजार असतो.

५) सिरॉसिस अनेकदा आजाराने गंभीर स्वरूप धारण केल्यावरच कळून येतो. कारण आपल्याला कावीळबद्दलची असलेली गैरसमजूत. कावीळकरिता घरगुती, गावठी औषध घेऊन पुढे आजार बळावल्यावरच डॉक्टरकडे या रुग्णांना नेले जाते. परंतु अनेकदा असेही घडते की रुटीन चेकअपमध्ये हेपेटायटिस बी किंवा सी झालेली कळते व सुरुवातीपासून या रुग्णांना योग्य तो उपचार मिळतो.

६) सिरॉसिस सुरुवातीच्या स्टेजमध्ये असेल तर औषधपाणी घेऊन तो आटोक्यात ठेवता येतो. पण पूर्ण लिव्हर खराब झाली असेल तर लिव्हर ट्रान्सप्लाण्ट म्हणजे यकृत प्रत्यावरोपण हाच उपाय त्यांच्यासाठी शिल्लक उरतो. पोटामध्ये भरलेले पाणी वारंवार काढावे लागते. ते कमी होण्यासाठी महागडी औषधे (अल्बुमीन, जास्त लघवी होणारी औषधे) घ्यावी लागतात. सिरोसीस झालेल्या रुग्णांनी मीठ कमी खावे. पुढे यकृत काम करणे हळूहळू बंद होते. किडनीचे कार्यही व्यवस्थित राहात नाही. शेवटी कोमात जाऊन रुग्ण दगावतो.

सिरॉसिस टाळण्याकरिता काय खबरदारी घ्यावी-

१. कावीळ झाल्यास त्याचे योग्य निदान करून त्याचा कुठला प्रकार आहे ते पाहावे.

२. रक्त तपासणीमध्ये हेपेटायटिस बी किंवा सी असल्यास त्याच्या उपचारांमध्ये दिरंगाई करू नये. व्यवस्थित व डॉक्टर सांगतील तितके दिवस औषधे चालू ठेवावीत.

३. दारू पिणाऱ्यांनी व्यसन कमी करावे, नियमित रक्ततपासण्या व लिव्हर तपासणी करून घ्यावी.

४. थोडीशी कावीळ आहे म्हणून दुर्लक्ष करू नये.

थोडक्यात सिरॉसिस हा एक यकृताचा गंभीर आजार आहे. सुरुवातीस (ग्रेड ए) मध्ये औषधे व उपचार करून चांगले आयुष्य जगता येते, पण हा आजार पुढे गेल्यास (ग्रेड सी), तर पुढे उद्भवणाऱ्या समस्या व मोजक्याच आणि महागडय़ा उपचारांअभावी रुग्णाचे आयुष्यमान कमी असते.

(माहिती सौजन्य : डॉ. अविनाश सुपे)