देशात ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. ओला देखील या इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीसाठी सज्ज आहे.ओला इलेक्ट्रिकने बुधवारी सकाळी आपल्या एस १ श्रेणीच्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ग्राहकांसाठी ऑनलाइन विक्रीला सुरुवात केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच हा सेल होणार होता परंतु तांत्रिक अडचणींमुळे कंपनीला १५ सप्टेंबरची तारीख पुढे ढकलणे भाग पडले.

आजपासून विक्री सुरू

ओला इलेक्ट्रिकला विक्रीपूर्वी आतापर्यंत ५ लाख प्री-बुकिंग मिळाले आहे. कंपनीने १५ ऑगस्टपासून ओला इलेक्ट्रिक स्कूटर एस १ आणि एस १ प्रो साठी बुकिंग घेणे सुरू केले. जेव्हा त्याची विक्री ८ सप्टेंबरपासून सुरू झाली, तेव्हा वेबसाइट क्रॅश झाली, ज्यामुळे त्याची विक्री १५ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलावी लागली.

पहाटेच सुरु झाली विक्री

विक्रीची विंडो बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास उघडली आणि यावेळी, कोणतीही अडचण नसल्याचे दिसून आले. अनेक ग्राहकांनी एक प्रक्रिया सुरळीत सुरु आहे हे सांगण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला. ओला इलेक्ट्रिक डिरेक्ट-टू-होम (direct-to-home) विक्री मॉडेलचे अनुसरण करत आहे ज्यामध्ये आरक्षण आणि खरेदी पूर्णपणे ऑनलाइन केली जाते. कंपनीने कर्ज देण्यासाठी आणि EMI योजना देण्यासाठी अनेक वित्तीय संस्थांशी करार केला आहे.

किंमत किती?

ओला इलेक्ट्रिकने या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती आधीच जाहीर केल्या आहेत. ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या एस १ व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ९९,९९९ रुपये आहे, तर एस १ प्रो व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत १,२९,९९९ रुपये आहे.

१८१ किलोमीटरची श्रेणी

ओला इलेक्ट्रिक स्कूटरचे एस १ व्हेरिएंट पूर्ण चार्जवर १२१ किलोमीटरची रेंज देते. तर एस १ प्रो व्हेरिएंट एकाच चार्जवर १८१ किमी चालते. एस १ व्हेरिएंट ३.६ सेकंदात ०-४० किलोमीटर प्रतितासाचा वेग देते, तर एस १ प्रो व्हेरिएंट ३ सेकंदात ०-४० किलोमीटर प्रतितास वेग देते.