व्यवसायाशी संबंधित पटाचे खेळ खेळण्यापासून ते पैसे वाचवण्याच्या क्लृप्त्या शिकवण्यापर्यंत, आपले आई-वडील अनेक गोष्टी आपल्याला शिकवत असतात. त्यांच्या आयुष्यात आर्थिक गोष्टींसंदर्भात वैयक्तिक पातळीवर विविध प्रयोग करून मिळवलेले ज्ञान ते वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला देतात. आपले बजेट ठरवत असताना, कर्जे हाताळत असताना, संपत्ती उभारत असताना किंवा आपल्या आर्थिक आरोग्याचे जतन करत असताना हे ज्ञान नेहमीच उपयोगी पडते. वय वाढत असताना आपण शिकलेल्या आणि पुन्हा पुन्हा उजळणी केलेल्या धड्यांची ही यादी पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लवकर आणि शक्य तेव्हा बचत करा

याची सुरुवात त्या गोंडस पिगी बँकेने झाली, जिच्यात तुमचे आई-वडिल दररोज एक किंवा दोन नाणी ठेवायला सांगायचे. एके दिवशी ती रक्कम मोठी होऊन तुम्हाला हवे असलेले खेळणे सहा महिन्यांत किंवा वर्षभरात खरेदी करता येईल, या आशेने तुम्ही बचत करत राहिलात. तुमचा हा निधी फोडायचा क्षणिक मोह अनेकदा ‘संपत्ती एका दिवसात उभी राहात नाही’ अशा वचनांमुळे तुम्ही आवरता घेऊ शकलात. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीपासून एक छोटी रक्कम बाजूला साचवून ठेवायची व कालांतराने एक भलामोठा निधी उभारायचा हे तुम्ही तेव्हापासून शिकत आलात. संयमाचे फळ अखेर मिळेलच या आशेने तुम्ही प्रोत्साहित राहिलात आणि शेवटपर्यंत शिस्तबद्ध राहिलात. तुमच्या आई-वडिलांनी तुम्हाला आयुष्याच्या सुरुवातीलाच छोटी रक्कम साठवण्याची सवय लावल्याने मोठा निधी उभारण्यास त्याची किती मदत होऊ शकते ते सुद्धा सांगितले.

खूप जास्त कर्जे घेणे टाळा

तुम्ही घरच्यांसोबत, विशेषत: वडिलांसोबत अनेकदा याविषयावर बोलला असाल, की नीट नियोजन न केलेल्या कर्जांमुळे कोणाचीही आर्थिक स्थिती कशी बिघडू शकते. यामुळे कर्ज घेण्यासंदर्भातील तुमच्या गरजेचे विश्लेषण करण्यास आणि आवश्यक व अनावश्यक खर्च यांची नीट वर्गवारी व निवड करण्यास तुम्हाला मदत झाली असेल. अनावश्यक कर्जे टाळणे आणि मोठ्या हप्त्याच्या ओझ्यापासून दूर राहणे अतिशय आवश्यक असते. कर्ज हे एक आर्थिक ध्येय गाठण्यासाठी घ्यायचे असते. घर घेण्यासाठी कर्ज घेतल्याने तुमच्या एकूण संपत्तीत भर पडते आणि भविष्यातही त्यास मूल्य प्राप्त होते, म्हणून हे कर्ज चांगले असते. म्हणूनच, कर्ज घेण्यापूर्वी चांगली उधारी कोणती व वाईट उधारी कोणती हे समजून घेणे आवश्यक असते. खूप कर्जे घेतल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर घसरू शकतो आणि भविष्यात कर्ज मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते. म्हणूनच, तुमच्या वडिलांचा सूज्ञ आणि समंजस सल्ला पाळा.

लवकरात लवकर उधारी फेडा

जर तुम्ही तुमच्या मित्राकडून काही घेतले असेल, मग ते गोष्टीचे पुस्तक असो किंवा एखादे पेन, तर तुमच्या आई-वडिलांनी वारंवार तुम्हाला ते परत करायची आठवण करून दिली असेल, ज्यातून उधारीची वेळेवारी परतफेड करण्याचे महत्त्व तुम्हाला शिकता आले असेल. हप्ते उशिरा फेडल्याने किंवा न फेडल्याने आर्थिकदृष्ट्या तुम्ही कमकुवत होताच, पण तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होतो. ज्यामुळे कर्ज देणाऱ्यांच्या दृष्टीत तुमची प्रतिमा खराब होते. तुम्हाला तुमची आर्थिक ध्येये वेळेत पूर्ण करण्यासाठी आयुष्यात अनेक बदल करावे लागतात. म्हणूनच लक्षात ठेवा, की चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास त्याचा खूप फायदा होतो.

कुटुंबाला आधार द्या

तुमच्या वडिलांनी पैशाची चणचण असताना कायम स्वत:आधी तुमच्या गरजांची पूर्तता केलेली आहे. हेच मूल्य आत्मसात करा आणि तुमच्या कुटुंबासाठी सर्वांत चांगले जे असेल तेच करा. पैशाबाबत काटकसर करताना तुमच्या कुटुंबासाठीची आर्थिक ध्येये तुमच्या व्यक्तिगत इच्छांहून वरचढ ठरावीत.

विमा काढून घ्या

तुम्ही तुमच्या आई-वडिलांना आयुर्विमा आणि आरोग्य विमा खरेदी करताना पाहिले असेल, ज्यामार्फत त्यांचे आणि कुटुंबाचे रोगांपासून व अवेळी मृत्युपासून आर्थिकदृष्ट्या संरक्षण होते. ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकासाठी पुढे लाभदायक ठरते. या उत्पादनांकडे दुर्लक्ष करून स्वत:च्या आप्तेष्टांना ऐनवेळी अनपेक्षितपणे संकटात टाकण्याची नामुष्की तुम्हाला नको असते. प्रिमियम वेळेवर भरणे आवश्यक असते, ज्यामुळे तुमचे कुटुंब कायम आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहते.

पुरेसा आपातकालीन निधी तयार करा

तुमच्या वडिलांचे म्हणणे आठवा, ‘कधीतरी गरज लागेल त्यासाठी आजच साठवा.’ याचा अर्थ असा की समजा नोकरी जाणे, आरोग्याशी संबंधित दुर्घटना घडणे, इ. संकटाची समस्या उद्भवल्यास तुमच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी तुम्ही एका आपातकालीन निधीसह सज्ज राहायला हवे. पैशांची चणचण असताना तुमची बिले, भाडे, हप्ते आणि इतर न टाळता येणाऱ्या सर्व गोष्टींची काळजी घेता यावी यासाठी तुमच्याजवळ ६ ते १२ महिन्यांच्या खर्चांएवढी रक्कम साठवलेली असायला हवी.

आदिल शेट्टी,

सीईओ, बँकबझार

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Financial lessons to learn from parents
First published on: 14-06-2018 at 15:31 IST