पालकांना गमावणे ही गोष्ट पचनी पडणे कदाचित सर्वात कठीण गोष्ट असते. ते दु:ख तुमच्या मनात खूप काळ भावनिक पोकळी निर्माण करू शकते. परंतु, पालकांच्या मृत्यूनंतर काही अतिमहत्त्वाची अर्थविषयक कामे असतात जी आपल्याला पूर्ण करावी लागतात. अशा वेळी आर्थिक बाबी सुरळीत करणे जरी खूप कष्टप्रद असले, तरी तुमच्या पालकांकडून वारशाने मिळालेल्या संपत्तीची व्यवस्था लावणे हे तुमचे कर्तव्य आहे. तुम्ही एवढी वर्षे तुमच्या पालकांनी जमवलेली संपत्ती सोडून तर देणार नाही ना…

परंतु या कामाबाबत तुम्हाला अनेक प्रश्न जर भंडावून सोडत असतील, जसे की, कुठून सुरुवात करावी, एखादी गुंतवणूक कशी हस्तांतरित करावी किंवा मिटवावी, महत्त्वाच्या आर्थिक दस्तावेजांचे व्यवस्थापन कसे करावे, तर महत्त्वाच्या आर्थिक कामांबाबत तुम्हाला मदत करण्यासाठी ही मार्गदर्शिका आहे.

१. मृत्यू प्रमाणपत्र, मृत्युपत्र किंवा उत्तराधिकारी प्रमाणपत्र मिळवणे

मृत्यू प्रमाणपत्र हा अतिशय महत्त्वाचा कायदेशीर दस्तावेज आहे, जो मृत व्यक्तीच्या संपदांचे हस्तांतरण, खाते बंद करणे अशा कोणत्याही आर्थिक व्यवहारादरम्यान आवश्यक असतो. यामध्येही मृत्यू प्रमाणपत्राचे तपशील तुमच्या पालकाने दिलेल्या दस्तावेजाच्या पुराव्यांशी मिळते जुळते असायला हवेत. ते न जुळल्यास अधिकृत अभिलेख अद्ययावत करण्याची किंवा मिटवण्याची तुमची विनंती नाकारली जाऊ शकते. मृत्यू प्रमाणपत्र हा पालकांच्या मृत्यूनंतरचा महत्त्वाचा दस्तावेज असल्यामुळे, त्याच्या काही प्रती तुमच्याजवळ ठेवण्याची खात्री करा.

तुमच्या पालकाने केलेल्या मृत्युपत्रामुळे वारसाहक्कासंबंधातील प्रश्न सुटण्यास मदत होईल. जरी काही विशिष्ट जंगम मालमत्तांकरिता तुमच्या पालकांनी नामांकन केलेले असेल, तरीही अशा सर्व नामांकनाहून मृत्युपत्र वरचढ ठरेल. नामांकन आणि मृत्युपत्र नसल्यास, तुम्ही उत्तराधिकारी प्रमाणपत्रासाठी अर्ज करायला हवा ज्याचा वापर केवळ जंगम मालमत्ता उत्तराधिकाऱ्याच्या नावे करण्यासाठी केला जाऊ शकतो.

२. आर्थिक दस्तावेज आणि अभिलेख गोळा करणे

तुमच्या पालकांनी आर्थिक बाबतींविषयी सर्व आवश्यक माहिती तुम्हाला सांगितली असेलच असे नाही. त्यामुळे पालकांची सर्व कागदपत्रे आणि रोजनिशी तपासा आणि कर्ज, गुंतवणूक यांबाबत काही आर्थिक माहिती मिळते का ते पाहा.

३. गुंतवणूक, कर्ज आणि दायित्वे वेगवेगळी करा

परिस्थितीचा पूर्ण ताबा मिळवण्यासाठी, तुमच्या पालकांच्या मृत्यूनंतर तुमच्या खात्यात येणारी गुंतवणुकीची रक्कम, कर्ज आणि दायित्वे यांचे नेमके तपशील माहिती असणे आवश्यक असते. यामुळे तुमच्या विद्यमान आर्थिक परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे तुम्हाला कर्जाच्या योग्य किंवा खोट्या दाव्यांना हाताळण्यासही मदत होऊ शकते. महत्त्वाचे तपशील मिळवण्याचा योग्य मार्ग म्हणजे मागील ५ वर्षांच्या बँकेच्या विवरणाचे विश्लेषण करणे. तुम्ही विविध स्रोतांकडून तपशील मिळवण्यासाठी सीएची मदत घेऊ शकता. विविध खात्यांसंबंधात माहिती द्या, ती बंद करा किंवा हलवा. सर्व महत्त्वाची खाती तात्काळ बंद करणे अतिशय महत्त्वाचे असते. नाहीतर हॅकर्स आणि फसवणूक करणारे त्यांचा गैरवापर करू शकतात.

४. बँक खाते, लॉकर, कर्ज आणि क्रेडिट कार्ड्स

पालकांचे बँक खाते त्याच्या/तिच्या मृत्यूनंतर बंद करायला हवे. तुम्ही त्यातील उर्वरित निधी हस्तांतरित करण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्रासह आणि मृत्यूपत्राच्या/नामांकिताच्या तपशिलासह खाते बंद करण्याचा अर्ज सुपूर्द करावा. तसेच, संबंधित दस्तावेजासह लॉकर उघडून घ्यावे. क्रेडिट कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी ते तात्काळ बंद करून घ्यावे. कायदेशीर वारसदारांकडून कर्जवसुलीसाठीची कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी संबंधित संस्थेकडे जाऊन कर्जाचे खाते बंद करून घ्यावे. कर्ज चुकते केल्यानंतर, बँकेकडून मूळ दस्तावेज आणि शून्य दायित्वाचे प्रमाणपत्र घेण्यास विसरू नका.

५. स्थावर मालमत्ता

तुम्ही चारचाकी वाहन, बाईक अशासारख्या स्थावर मालमत्ता आरटीओ कार्यालयाकडे आवश्यक दस्तावेज अर्जासकट सादर करून स्वत:च्या नावे करून घ्याव्यात. यामुळे तुम्हाला वाहनाची पुनर्विक्री करण्यास मदत होईल.

६. गुंतवणूक

म्युच्युअल फंड, नियत ठेवी, भाग आणि टपाल बचत योजना यांसारख्या गुंतवणुकीतील दस्तावेज त्वरित अद्ययावत करून घ्याव्येत. तुम्हाला नामांकित व्यक्तीच्या खात्यामध्ये रक्कम येण्यासाठी आवश्यक प्रपत्रासह मृत्यू प्रमाणपत्राची, आणि गुंतवणूक तपशिलाची गरज पडेल आणि नामांकिताचे नाव नसल्यास तुम्हाला अर्जासह उत्तराधिकारी प्रमाणपत्र सुपूर्द करावे लागू शकते.

उपरोक्त आर्थिक प्रकरणांशी संबंधित पावले उचलण्याबरोबरच, तुम्ही मुलभूत सेवांच्या बिलांचे नाव आणि स्थानिक नगरपालिका नोंदणीमधील नाव बदलायला हवेत. सर्व सामाजिक माध्यम खाती आणि ई मेल आयडी बंद करावेत. अप्रत्यक्ष सेवा विभागाकडून आणि इतर संबंधित प्राधिकरणांकडून व्यवसाय मालकी तपशील अद्ययावत करा. तसेच, अंतिम रिटर्न भरल्यानंतर पॅन कार्डही बंद करा.

अदिल शेट्टी,

सीईओ, बँक बाजार