18 October 2019

News Flash

आत्महत्यांचा देश बनला सर्वाधिक आनंदी देश!

आत्महत्या टाळण्यासाठी या देशात दशकभरापासून सार्वजनिक आरोग्य योजना राबविली जात आहे.

मानसिक आरोग्याबाबतची ही बातमी भारतातली नसली, तरी महाराष्ट्रासारख्या शेतकरी आत्महत्याग्रस्त राज्यातील धोरणाकर्त्यांना निश्चितच विचार करायला लावणारी आहे. १९९० मध्ये जगात आत्महत्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला (पहिला क्रमांक हंगेरी) फिनलंड हा आता लागोपाठ दुसऱ्या वर्षीही जगातला सर्वात आनंदी देश असल्याची घोषणा गेल्याच महिन्यात संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. त्या देशातील तज्ज्ञांनी याचे श्रेय तेथील सरकारने दशकभर राबविलेल्या सामाजिक आधाराच्या मोहिमेला दिले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे फिनलंडमधील आत्महत्यांचे प्रमाण आता १९९०च्या तुलनेत निम्म्याने कमी झाले आहे. अत्यंत प्रतिकूल, हाडे गोठवून टाकणारे हवामान असलेल्या फिनलंडमध्ये हे घडले कसे, असा प्रश्न साहजिकच कोणालाही पडेल. हाच प्रश्न फिनलंडमधील राष्ट्रीय आरोग्य आणि विकास संस्थेचे प्राध्यापक टिमो पाटरेनेन यांना विचारला असता, ते म्हणाले की, ‘फिनलंडचे प्रतिकूल हवामान आणि काँक्रीटच्या गावांचा संबंध आत्महत्यांशी जोडण्याचा प्रयत्न करू नका. जगाच्या कोणत्याही भागात राहणारी व्यक्ती नैराश्याचा सामना करीत असेल, तर ती आत्महत्या करण्याची तेवढीच शक्यता असते. या प्रश्नाचा सामना करताना तुम्ही समाजाशी किती जोडले गेला आहात आणि दुसऱ्याची मदत घेण्याची तुमची कितपत तयारी आहे या गोष्टी यात महत्त्वपूर्ण ठरतात.’

आत्महत्या टाळण्यासाठी या देशात दशकभरापासून सार्वजनिक आरोग्य योजना राबविली जात आहे. त्याअंतर्गत नैराश्याची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींना उपचार आणि आधार दिला जातो. याबाबत माध्यमांमधील वृत्तांकनही अत्यंत जबाबदारीने केले जाईल, याची दक्षता तेथे घेतली जाते. आपल्या भावना मुक्तपणे व्यक्त केल्या पाहिजेत, असे आता तेथील लोकांना, विशेषत: पुरुषांना समजले आहे, असे पाटरेनेन म्हणाले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, आत्महत्यांच्या बाबबीत आता जगात फिनलंड २२व्या क्रमांकावर आहे. ही संख्या अमेरिकेपेक्षा कमी आणि ऑस्ट्रेलियापेक्षा एका स्तराने जास्त आहे. फिनलंडमधील जंगले, तलाव आदी निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यास प्राधान्य देणाऱ्या येथील ८६ टक्के नागरिकांनी आपण काम आणि रोजच्या जगण्याचा समतोल साधून सुखी असल्याचे गतवर्षीच्या सर्वेक्षणात सांगितले होते.

First Published on April 13, 2019 11:43 pm

Web Title: finland the happiest country in the world