अनेकदा आपल्याला एचआयव्ही झाला आहे, अशी भीती अनेकांना वाटते. तेव्हा रुग्णालयात जाऊन तपासणी करण्याची मात्र हिंमत होत नाही. पण आता ‘बायो-शुअर-युके’ या कंपनीने घरीच एचआयव्ही तपासणीची सोय उपलब्ध करून दिली आहे. या संचाच्या सहाय्याने अवघ्या १५ मिनिटांत संबंधिताला एचआयव्ही झालेला आहे किंवा नाही, याची खातरजमा करता येणार आहे. हा एचआयव्ही तपासणी संच ऑनलाईन विक्रीसाठीही खुला करण्यात आल्याची माहिती ‘बीबीसी’ या वृत्तसंस्थेतर्फे देण्यात आली आहे. माणसाच्या रक्तातील एन्टीबॉडीजची संख्या तपासून हा संच एचआयव्हीसंदर्भातील निदान करतो. रक्ताचा एक थेंब या तपासणीसाठी पुरेसा असून, उपकरणातील दोन जांभळ्या रंगाच्या रेषा एचआयव्ही झाल्याचे निदान करतो. त्यामुळे अशाप्रकारच्या जांभळ्या रेषा दिसल्यास संबंधित व्यक्तीने त्वरित रूग्णालयात जाऊन पुढील तपासणी करण्याचा सल्ला कंपनीतर्फे देण्यात आला आहे.

अनेकदा रूग्ण तपासणी करण्याचे टाळतात त्यामुळे हा आजार बळावतो. मात्र, या संचामुळे प्राथमिक टप्प्यावरच एचआयव्हीचे निदान करता येईल. त्यामुळे लवकरात लवकर उपचार सुरू करून एचआयव्हीची समस्या अधिक जटील होण्याचा धोका टाळता येणे शक्य होईल.