‘मी तुझ्यासाठी चंद्राचा तुकडा तोडून आणेल’
‘मी तूला चंद्रावर घेऊन जाईल’ असे प्रियकर प्रेयसीचे संवाद आपल्याला काही नवे नाही. प्रियकर आपल्या प्रेयसीला चंद्रावर घेऊन जाण्याचे स्वप्न दाखवत असला तरी ते काही प्रत्यक्षात येणार नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे.  चंद्रावर जाण्यासाठी आपण अंतराळवीर थोडीच आहोत. त्यामुळे चंद्रावर जाण्याच्या फक्त कल्पना रंगवण्यापेक्षा आपण सामान्य माणसं दुसर काय करू शकतो. पण भविष्यात मात्र चंद्रावर जाण्याची संधी आपल्यासारख्या सामान्य माणसालाही मिळू शकते. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरंय. २०१८ पर्यंत दोन सामान्य नागरिकांना चंद्रावर पर्यटनासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती स्पेसएक्सने दिली आहे.

चंद्रावर पर्यटनासाठी जाण्याकरता दोन सामान्य नागरिकांनी आपल्याशी संपर्क साधला आहे असे स्पेसएक्सचे कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी सांगितले. या वर्षांच्या अखेरपर्यंत त्यांना ट्रेनिंग देण्यात येणार असून त्यांना २०१८ च्या अखरेपर्यंत चंद्रावर पाठवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. हे दोन नशीबवान माणसं कोण आहेत हे मात्र त्यांनी उघड केले नाही. पण हॉलीवूडमधले नक्कीच कोणी नसेल हेही सांगायला ते विसरले नाही. या प्रवासासाठी दोन्ही व्यक्तींनी पैसेही भरले असल्याचे एलनने सांगितले. पण किती पैसे भरले हे त्यांनी गुपीत ठेवले. तेव्हा चंद्रावर पर्यटनासाठी जाणारे ही दोन नशीबवान माणसं कोण आहेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.