लंडन : दिवसाला केवळ एक ग्रॅम माशाचे तेल सेवन केल्याने संधिवाताचा त्रास असणाऱ्यांच्या वेदना कमी होत असून त्यांच्या हृदयाच्या आरोग्यातही सुधारणा होत असल्याचा दावा एका अभ्यासातून करण्यात आला आहे.

ब्रिटनमधील सरे विद्यापीठातील संशोधकांनी यापूर्वीच्या ६८ अभ्यासांचे विश्लेषण केले.

कमी प्रमाणात माशांच्या तेलापासून तयार केलेल्या औषधाची मात्रा घेतल्याने संधिवातांच्या रुग्णांच्या वेदना कमी होत असून हृदयाच्या आरोग्यातदेखील सुधारणा होते.

माशांच्या तेलामधील मेदयुक्त आम्ल सांध्यांमधील जळजळ कमी करून वेदना कमी करण्यास मदत करते.

हा अभ्यास जर्नल हय़ुमेटॉलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. योग्य आहार आणि नियमित व्यायामाचे महत्त्व कधीही कमी लेखू नये, असे सरे विद्यापीठाचे प्राध्यापक मर्गारेट रेमॅन यांनी सांगितले.

आहाराचा आपल्या आरोग्यावर मोठय़ा प्रमाणात परिणाम होत असून आपली शारीरिक क्रिया योग्य रीतीने चालण्यासाठी आवश्यक पोषक तत्त्व शरीरात जाण्याची आवश्यकता आहे, असे रेमॅन यांनी सांगितले. त्याच प्रमाणे ‘क’ जीवनसत्त्व जास्त असणारे पदार्थदेखील संधिवाताचा त्रास असणाऱ्यांसाठी उपयोगी असल्याचे त्यांनी सांगितले.

‘क’ जीवनसत्त्व हाडांसाठी उपयोगी असून त्याचे कमी प्रमाण असल्यास त्याचा परिणाम हाडांची वाढ होत असून संधिवाताचा धोका बळावतो. लठ्ठपणामुळेही  सांध्यांवर ताण येतो.

आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल केल्यास रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होत असून उच्च रक्तदाबाचा संबंध संधिवाताशी जोडण्यास आला असल्याचे संशोधकांनी सांगितले.