हळदीचं दूध आरोग्यासाठी चांगलं असतं हे तुम्ही अनेकदा वयस्कर लोकांकडून ऐकलं असेच. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. वजन कमी करणे, जखमेवरील मलम, त्वचेसाठी हळदीचा वापर होतो. मात्र याच हळदीचे दुधाबरोबर सेवन केल्यास त्याचा जास्त फायदा होतो. हळदीचे दूध हिवाळ्यात रोज प्यायल्यास ते आरोग्यासाठी फायद्याचे असते. जाणून घेऊयात हळदीच्या दुधाचे फायदे…

प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपायला जाण्यापूर्वी ग्लासभर हळदीचे दूध प्यायल्यास आरोग्याला त्याचा फायदा होतो. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संसर्गावर हा चांगला उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास खोकल्याचा त्रास कमी होतो.

यकृतामधील हानीकारक घटक नष्ट करणे
हळदीमुळे यकृताला फायदा होतो असे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. यकृतामधील मेदांवर तसेच लिव्हर सिरोसिसवर हळदीचे दूध हा रामबाण उपाय आहे. ‘जर्नल ऑफ फूड सायन्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार हळदीमुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्याला प्रतिबंध बसतो. तसेच हळदीच्या सेवनामुळे यकृतामध्ये मेद साठवण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे यकृतासंदर्भातील आजार होण्याचा धोका कमी होतो. केवळ यकृतच नाही तर अल्झायमरपासून ते रक्त शुद्ध करण्यापर्यंत हळदीचे अनेक फायदे आहेत.

पचनशक्ती वाढवते
पचनाशी संबंधित आजारांवर हळद हे नैसर्गिक औषध आहे. पोटातून येणारा आवाज, गॅसेसचा त्रास तसेच छातीत जळजळण्याचा त्रास यावर एक कप हळदीचे दूध हा उत्तम उपाय आहे. ‘नॅचरल लिव्ही आयडीयज डॉट कॉम’नुसार हळदीच्या सेवानामुळे आतड्याला होणारा संसर्ग आणि जंत होण्याचा त्रासापासून मुक्ती मिळते. मात्र पचनशक्ती संदर्भातील अडचणींसंदर्भात हळद घालून दूध पिताना गायीचे दूध म्हशीच्या दुधापेक्षा जास्त चांगले असते हे लक्षात घ्यायला हवे.

वजन कमी करण्यासाठी फायद्याचे
वजन कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे हळदीचे दूध पिणे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. हळदीमुळे मेदाचे (फॅट्सचे) विघटन होते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. एका संशोधनानुसार जाडपणा घालवण्याचा महत्वाचा टप्पा असणारा भाग म्हणजे फॅट बर्न. हळद या फॅट बर्नला सुरुवात करते.

सांधेदुखी आणि स्नायू दुखणे
थंडीमध्ये सांधेदुखाचा त्रास अनेकांना होतो. खास करुन वयस्कर व्यक्तींना सांधेदुखीबरोबर स्नायू दुखण्याचाही त्रास होतो. मात्र हळदीचे सेवन केल्यास पचन, त्वचा आणि एकंदरीत आरोग्यासाठी उपयुक्त असते. सांधेदुखीवर हळदीचे दूध उपयुक्त ठरते.