नैराश्य या मानसिक आजाराचे पाच नवीन प्रकार दिसून आले आहेत. आतापर्यंत नैराश्य व चिंता यांचे निदान स्थूलमानाने करण्यात येत होते. नैराश्य किंवा चिंताग्रस्ततेत मेंदूचा कुठला भाग उद्दिपित होतो यावरून हे नवीन प्रकार सांगण्यात आले आहेत. त्यात ताण, साधारण चिंता, जीवनात आनंद नसणे, अतिचंचलता, उदासीनतेची जाणीव असे त्यांचे वर्गीकरण केले आहे. अनेकदा उपायांची निवड करताना अचूकता राहात नाही. त्यामुळे त्यातील बारीक भेद लक्षात घेतले पाहिजे असे जेएएमए सायकिअ‍ॅट्री नियतकालिकात म्हटले आहे. आजच्या काळात नैराश्य व चिंता हे अनेक आजारांचे कारण असून त्यामुळे जगभरातील कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊन उत्पादकता कमी होत असते. या आजारातून केवळ एक तृतीयांश लोक बाहेर येतात. असे स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासात म्हटले आहे. यूएस डायग्नॉस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेन्टल डिसऑर्डर्समध्ये अवसाद म्हणजे नैराश्याचे जे आताचे वर्गीकरण आहे ते नैराश्य व चिंता या स्वरूपात आहे, पण यातील अनेक लक्षणे एकमेकात गुंतलेली आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील उपचारांसाठी बायोलॉजिकल मार्कर म्हणजे जैव निदर्शक घटक शोधणे अवघड जाते. स्टॅनफर्डचे प्राध्यापक लियन विल्यम्स यांनी सांगितले की, अचूक निदानाने उपचारही अचूक होत असतात. यात ४२० रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. लक्षणांचे स्वकथन, निदान चाचण्या व ब्रेन मॅपिंग या मार्गानी यात संशोधन केले गेले. यात वरील पाच प्रकारातील रुग्णांचे प्रमाण १३ टक्के (अ‍ॅक्शियस अरोजल), ९ टक्के (जनरल अँझायटी), ७ टक्के अनहेडोनिया, ९ टक्के मेलनचोलिया, १९ टक्के (टेन्शन) याप्रमाणे दिसून आले.