गेल्या आठवड्यात फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि अन्य ई कॉमर्स कंपन्यांनी सेल आयोजित केला होता. यामध्ये ग्राहकांना अनेक ऑफर्ससोबत कॅशबॅकची सुविधाही मिळत होती. या सेलमुळे ग्राहकांचा किती फायदा झाला हे माहित नाही पण ई कॉमर्स कंपन्या मात्र चांगल्याच मालामाल झाल्या आहेत.

या कंपन्यांच्या सेलला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचं समोर आलं आहे. जवळपास पाच दिवस आयोजित केलेल्या या सेलमध्ये ई कॉमर्स कंपन्यांना तब्बल 15 हजार कोटी रुपयांचा नफा झाल्याचं समोर आलं आहे. RedSeer consulting ने एका सर्वेक्षणाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.  RedSeer consulting च्या रिपोर्टनुसार 9 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान ई कॉमर्स कंपन्यांना 15000 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत 64 टक्के जास्त फायदा झाला असून दरवर्षी या कंपन्यांचा फायदा वाढतच आहे. गेल्या वर्षी या कंपन्यांना 10 हजार 325 कोटींचा फायदा झाला होता.

‘ग्रेट इंडिया फेस्टिवल सेलने सेल सुरू झाल्यानंतर अवघ्या 36 तासांमध्येच गेल्या वर्षीचा विक्रम मोडला. यावर्षी आम्हाला अनेक नवे ग्राहक मिळाले, विशेष म्हणजे नव्या ग्राहकांमध्ये छोट्या शहरांतील ग्राहकांची संख्या लक्षणीय होती. यंदा जवळपास सर्वच श्रेणींमधील उत्पादनांना उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यातही स्मार्टफोन आणि फॅशनचं क्षेत्र आघाडीवर होतं अशी माहिती अॅमेझॉन इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमित अग्रवाल यांनी दिली. सेलमध्ये शाओमीच्या 10 लाखांहून जास्त स्मार्टफोनची विक्री झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

दुसरीकडे फ्लिपकार्टबाबत बोलायचं झाल्यास संपूर्ण भारतीय ई कॉमर्स बाजारात 70 टक्के वाढ झाली. यामध्ये फ्लिपकार्टच्या 5 दिवसांच्या बिग बिलियन डेज चा समावेश आहे. या सेलमध्ये जर चार स्मार्टफोनची विक्री झाली असेल तर त्यापैकी तीन फोन हे वॉलमार्टची भागीदारी असलेल्या फ्लिपकार्टवरुन विकले गेले आहेत. यंदाच्या सेलला ग्राहकांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला, नव्या ग्राहकांमध्ये तब्बल 50 टक्क्यांची वाढ झाली. 25 मिलियनपेक्षा जास्त युजर्सनी सेलदरम्यान आमच्या अॅपचा वापर केला असं फ्लिपकार्टच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.