ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart ने नवीन डिलिव्हरी सर्व्हिस ‘Flipkart Quick’ लाँच करण्याची घोषणा केली आहे. या सेवेनुसार, ग्राहकांना फक्त 90 मिनिटांतच त्यांनी ऑर्डर केलेल्या सामानाची डिलिव्हरी मिळेल. सध्या ही सेवा बंगळुरूमध्ये काही निवडक ठिकाणीच सुरू करण्यात आली आहे. पण, पुढील काही महिन्यांमध्ये ही सेवा 6 नवीन शहरांमध्ये सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. फ्लिपकार्टचे उपाध्यक्ष संदीप करवा यांनी ही माहिती दिली.

‘Flipkart Quick’  ही फ्लिपकार्टची नवी सेवा ग्राहकांसाठी चांगला पर्याय ठरु शकते. पण या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त 29 रुपये मोजावे लागतील. हे पैसे फास्ट डिलिव्हरी चार्ज म्हणून आकारले जातील. या सेवेनुसार कंपनी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सामानाची डिलिव्हरी करेल. या सर्व्हिसमध्ये किराणा सामान, डेअरी प्रोडक्ट, मांस, मोबाइल इलेक्ट्रॉनिक अ‍ॅक्सेसरी आणि स्टेशनरी यांसारख्या दोन हजारांहून जास्त प्रोडक्ट्सचा समावेश आहे.

या सर्व्हिसमध्ये ग्राहकांना लवकर सामान पोहोचवण्यासाठी कंपनी अ‍ॅडव्हान्स लोकेशन मॅपिंगचा वापर करेल. अ‍ॅडव्हान्स लोकेशन मॅपिंगद्वारे ग्राहकाच्या लोकेशनची माहिती अधिक योग्यपणे मिळते. फ्लिपकार्टच्या  ‘Flipkart Quick’ सेवेमुळे अ‍ॅमेझॉनला चांगलीच टक्कर मिळणार आहे. सध्या फ्लिपकार्टच्या ‘फ्लिपकार्ट प्लस मेंबर्स’ना आणि ‘अ‍ॅमेझॉनच्या प्राइम मेंबर्स’ना एका दिवसात डिलिव्हरीचा फायदा मिळतो. म्हणजे ऑर्डर केल्यानंतर एका दिवसात ग्राहकाला त्याचं सामान पोहोचवलं जातं. पण आता ‘Flipkart Quick’  या नव्या सेवेद्वारे फक्त 90 मिनिटांतच सामान पोहोचवण्याची फ्लिपकार्टची योजना आहे.