स्तनामधील कर्करोगग्रस्त पेशी ओळखण्यासाठी अत्याधुनिक असे प्रतिदीप्तता प्रतिमा तंत्र (फ्लोरोसन्स इमेजनिंग टेक्नॉलॉजी) प्रथमच येथील ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) रुग्णालयात वापरण्यात आले आहे.

एम्सच्या सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. एसव्हीएस देव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तंत्र स्तनाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियांमध्ये क्रांतिकारी बदल घडविणारे आहे. शस्त्रक्रियेदरम्यान हे तंत्र वापरल्याने संबंधित पेशींचा भाग अचूकपणे ओळखण्यास मदत होते.

कर्करोगग्रस्त स्तनावर शस्त्रक्रिया करताना शल्यचिकित्सकांकडून रुग्णाला सुरक्षित अशा ‘इंडोसायानिन ग्रीन’ (आयसीजी) या हिरव्या रंगद्रव्याचे इंजेक्शन दिले जाते. हे रंगद्रव्य (डाय) किमतीच्या दृष्टीनेही परवडणारे आहे. त्यानंतर शस्त्रक्रिया सुरू असताना प्रतिदीप्तता प्रतिमा तंत्राचा वापर करून शल्यचिकित्सक हे रुग्णाच्या रक्तवाहिन्या, सूक्ष्म रक्तवाहिन्या, लसिका ग्रंथी-उतींमधील रक्त आदींच्या प्रवाहाचा मार्ग आणि शरीराच्या प्रमुख भागांमध्ये सुरू असलेला रक्तप्रवाह पाहू शकतात. ‘‘या वेळी शरीरातील संबंधित उती म्हणजेच पेशींचा समूह हा प्रतिदीप्त हिरव्या रंगाने उजळून निघतो. सध्या वापरात असलेल्या ब्ल्यू डाय म्हणजेच निळे रंगद्रव्य तंत्र आणि इतरही तंत्रांपेक्षा या प्रतिदीप्तता प्रतिमा तंत्राची विश्वासार्हता अधिक आहे.  त्याशिवाय हे तंत्र अनेकदा वापरता येते,’’ असे डॉ. देव यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी अशाप्रकारच्या अचूक माहितीच्या अभावी शरीरातील निरोगी लसिका ग्रंथीसुद्धा शस्त्रक्रियेने पूर्णत: काढून टाकल्या जात असत. त्यामुळे रुग्णाच्या आरोग्याची हानी होत असे. प्रतिदीप्तता प्रतिमा तंत्रामुळे आता रुग्णाच्या शरीरातील निरोगी पेशी, ग्रंथी शस्त्रक्रियेदरम्यान वाचविणे शक्य होत आहे. यातून रुग्ण अधिक सुरक्षित राहण्याबरोबरच उपचारात अधिक यश येणार आहे, असे डॉ. देव यांनी सांगितले.