दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘माटी के रंग’ महोत्सवात विविध राज्यांतील कलावंतांच्या हस्त, शिल्प व लोककलेचे अभिनव दर्शन रसिकांना होत आहे. देशातील विविध राज्यांच्या सांस्कृतिक वारशाची आणि निवडक कलांची ओळखही होत आहे. अभिनव भारतीय शिल्प कलाकृतींचे हे प्रदर्शन असून पहिल्या दिवसापासून रसिकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कस्तुरचंद पार्कवर १६ ऑक्टोबपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात  ७५० लोकनृत्य कलाकार, २०० हस्तशिल्प कलाकार, १०० पारंपरिक लोक चित्रकार सहभागी झाले आहेत. १३ नोव्हेंबरपासून लोकनृत्यांचे सादरीकरण होणार आहे. यात टापू (अरुणाचल प्रदेश), हारवेस्ट (मेघालय), चेराव (मिजोरम), तालुपि (नागालँड), हाई हक (त्रिपुरा), सिंघी छाम (सिक्किम), बिहू (आसाम), पुंग चोलम आणि थांगटा (मणिपूर), घुमर (हरयाणा), मयूर (उत्तरप्रदेश), छोलिया (उत्तराखंड), बधाई (मध्यप्रदेश), बीन जोगी (हरयाणा), गद्दी (हिमाचल प्रदेश), रौफ (जम्मू व काश्मीर), लुड्डी, नृत्य, भांगडा, गिद्धा (पंजाब), जब्रो (लेह-लद्दाख), कन्नीयारकली, कैकोट्टीकली (केरळ), कांगीलू व गरगलू (आंध्रप्रदेश), वीराई वीरनाटय़म् (पुडूचेरी) आणि घोडे मोडनी (गोवा) आदी लोकनृत्यांचा सहभाग राहणार आहे.
हस्तकला प्रदर्शनात महाराष्ट्र, मिझोरम, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, जम्मू व काश्मीर, मणिपूर, आसाम आणि हरयाणा आदी राज्यांतील हस्त व शिल्पकलेच्या वस्तू, केन, बांबू, लाकडापासून तयार केलेले फर्निचर, भरतकाम असलेल्या वस्तू, साडय़ा, शाल, दागिने, लाखाच्या बांगडय़ा, जोधपुरी लेदर चप्पल, वुलन कार्पेट आदी प्रदर्शनात पाहण्यासाठी आणि विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ठिकठिकाणच्या कलावंतांनी परस्परांशी संवाद साधून वस्तू अधिक आकर्षक आणि उपयोगी बनविल्या आहेत. रसिकांकडून पहिल्या दिवसापासूनच चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे हरयाणातील कलावंत धरमवीर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. उत्तर क्षेत्र सांस्कृतिक केंद्रांतर्गत त्यांचा या प्रदर्शनात स्टॉल आहे. हरयाणातील माती आणि चितोडगड येथील स्टोन डस्ट वापरून त्यांनी विविध आकर्षक वस्तू व मूर्ती बनविल्या आहेत.
उत्तर पूर्व क्षेत्र सांस्कृतिक केंद्रांतर्गत आसाममधून आलेले कलावंत अलाउद्दीन यांनी तेथील संस्कृतीची ओळख करून दिली. आसाममधील सांस्कृतिक कार्यक्रमात वापर होणाऱ्या जापी, बेजापी या सारख्या वस्तू तयार केल्या आहेत. मणिपूरचे कलावंत एन. इंगोबा यांनी ‘डॉल मेकिंग’ ही कला प्रदर्शित केली. त्यांच्या संस्कृतीचे खास वैशिष्टय़ असलेले ‘खंबा बुल कॅचिंग’ ही कलाकृती त्यांनी तयार केली असून तेथील मातीपासून विविध मूर्ती तयार केल्या आहेत. मणिपूरच्या मातीची खास वैशिष्टय़ेही त्यांनी सांगितली. प्रदर्शनात विविध राज्यांतील स्वादिष्ट व्यंजनेही उपलब्ध आहेत.
सांस्कृतिक केंद्रातून शोभायात्रा
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘माटी के रंग’ या महोत्सवात विविध राज्यांतील लोककलावंतांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. कस्तुरचंद पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात यावेळी विविध राज्यातील लोकनृत्ये सादर करण्यात आली. यावेळी शोभायात्रेत विविध राज्यातील कलावंत सहभागी झाले होते. कार्यक्रमाला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. रवींद्र सिंगल, पश्चिम क्षेत्राचे संचालक शैलेंद्र दसोरे, उत्तर क्षेत्राचे देवेंद्र सरोया, ताजीत आदी विविध केंद्रातील अधिकारी उपस्थित होते.
वाहनांची चोख व्यवस्था
हे प्रदर्शन १६ नोव्हेंबपर्यंत दुपारी १ ते रात्री १० या वेळेत पाहता येईल. यासाठी प्रवेश नि:शुल्क आहे. वाहनांची व्यवस्था बिशप कॉटन शाळा, सीएनआय १८४० चर्च तसेच केवळ १६ नोव्हेंबरला ऑल सेंट कॅथ्रेडल चर्च या ठिकाणी करण्यात आली आहे. प्रदर्शनात येऊन देशातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचा नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे आवाहन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी केले आहे.