22 January 2021

News Flash

शांत झोप लागत नाही? ‘हे’ उपाय करुन पाहा

काही गोष्टी टाळणे गरजेचे

सकाळी जाग आल्यावर तुम्हाला प्रसन्न, शांत, तरतरीत, ताजेतवाने वाटते का? जर सकाळचा पहिला चहा घेतल्याशिवाय तुम्हाला ‘फ्रेश’ वाटतच नसेल तर तुम्हाला हवी तेवढी आणि शांत झोप मिळत नाही. आरोग्य उत्तम राहण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक असते. मात्र ती मिळाली नाही की सगळे तंत्र बिघडते. उत्तम आजकाल बहुतेकांना रात्री उशीरापर्यंत झोप येतच नाही आणि आली तरी अधेमधे सारखी जाग येते, नाहीतर सकाळी अकारण लवकर जाग येते. अशी विस्कळीत झोप हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यच्यादृष्टीने त्रासदायक असते. चांगली झोप येण्यासाठी काही गोष्टी प्रकर्षाने टाळाव्या लागतात; तर काही ठरवून कराव्या लागतात.
हे टाळा

१. चहा, कॉफी, कोला पेये, एनर्जी ड्रिंक्स टाळावीत. घेतलीच तर दिवसभरात १०० मिलीपेक्षा जास्त घेऊ नयेत आणि दिवसातला शेवटचा चहा-कॉफी  किंवा ही पेये संध्याकाळी ४ नंतर घेऊ नयेत. या सर्व पेयात असलेल्या कॅफीनमुळे जागृतावस्था जास्त काळ लांबते आणि झोप नीट लागत नाही. या पेयांचा परिणाम सहा ते आठ तास राहतो, त्यामुळे संध्याकाळी उशीरा कॅफीनयुक्त पेये टाळावीत.

२. दुपारी झोपणे टाळावे. दुपारची वामकुक्षी वीस मिनिटांपेक्षा जास्त घेऊ नये. दुपारी तासभर झोपल्यास रात्री दोन तास उशीरा झोप येणार हे नक्की. मग साहजिकच सगळे गणित बिघडून जाते.

३. झोपण्यापूर्वी टेलिव्हिजन पाहणे, संगणकावर काम करणे, १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरणे टाळावे. या उपकरणातील किरणोत्सर्गामुळे झोपेवर परिणाम होतो.

४. झोपण्याच्या खोलीत खूप उजेड किंवा अंधारही नसावा. शक्यतो मंद उजेड असणे उत्तम.

५. गोंगाट, कर्कश आवाजांचे संगीत रात्रीच्यावेळी टाळावे.

हे करा

१. झोपेची वेळ ठराविक ठेवा. उदा. रात्री १० वाजता झोपत असाल तर नेहमी त्या एकाच वेळेस झोपण्याची सवय लागली की १० वाजले की आपोआप डोळे मिटू लागतील.

२. झोपण्यापूर्वी कपडे बदला. झोपताना घालायचे कपडे सैलसर, सुती आणि पूर्ण हात-पाय कव्हर करणारे असावेत. घट्ट कपडे, बर्म्युडा घालून किंवा उघडे झोपल्याने पहाटे थंडी वाजून किंवा डास चावून झोपमोड होण्याची शक्यता असते.

३. झोपण्यापूर्वी चेहरा कोमट पाण्याने धुवावा, केस विंचरावेत, शक्य असल्यास एखादा मंद सुवासिक सेंट किंवा अत्तर शिंपडावे.

४. मनातील चिंतादायक विचार झोप यायला त्रास देतात. त्यामुळे झोपताना मेडीटेशन केल्यास ते विचार कमी होऊन सकारात्मक भावना निर्माण होते. किमान इष्टदैवताची प्रार्थना म्हणावी.

५. झोपण्यापूर्वी वर्तमानपत्रे, पुस्तके, आध्यात्मिक विषयावरील थोडे वाचन करण्याची सवय ठेवली तरी झोप येऊ शकते.

६. आडवे झाल्यावर झोप न लागल्यास, १०० पासून शून्यापर्यंत उलटे आकडे म्हणावेत. बहुधा हे करताना झोप लागते.६. ज्यांना दिवसभर बैठे काम करावे लागते, अशांनी रात्री जेवण झाल्यावर शतपावली करावी किंवा २०-३० मिनिटे पायी फिरून यावे. यामुळे शरीराचा थोडा व्यायाम होऊन झोप येते.

७. झोपण्यापूर्वी खोलीतील उजेड, स्वच्छता, तपमान योग्य आहेत ना? यांचा विचार करावा. पंखा, एसी, खिडक्यातून येणारे वारे, उजेड, गाद्या, उशा, चादरी, पांघरुणे इत्यादी गोष्टी आपल्याला सुखकर वाटतील त्याप्रमाणे कराव्यात.

 

डॉ. अविनाश भोंडवे, फॅमिली फिजिशियन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2017 1:10 pm

Web Title: follow this things for sound sleep tips
Next Stories
1 गळणाऱ्या केसांची ‘अशी’ घ्या काळजी
2 दिवाळीत सोने किंवा गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करावी का?
3 ऑनलाइन शॉपिंग करताना ‘ही’ काळजी घ्या
Just Now!
X