वाढलेले वजन कमी करणे ही सध्या अनेकांपुढील एक मोठी समस्या असते. वजन वाढवणे एखादवेळी तुलनेने सोपे असते पण वाढलेले वजन कमी करणे हे मोठे आव्हान झाले आहे. जीवनशैलीत दिवसागणिक होणाऱ्या बदलांमुळे वजनवाढीची समस्या निर्माण होत आहे. जंकफूडचे आहारातील वाढते प्रमाण, बैठी जीवनशैली, जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळा, अन्नपदार्थांमधील सकसता आणि इतर अनेक गोष्टींमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. स्त्रिया आणि पुरुषांमध्ये अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत लठ्ठपाणाच्या समस्येला तोंड देताना कसरत होत आहे. वाढत्या वजनामुळे उद्भवणारे जीवनशैलीशी निगडित आजार आणि त्याचा एकूणच आरोग्यावर होणारा परिणाम ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे नंतर डॉक्टरांकडे जाऊन औषधे घेण्यापेक्षा योग्य वेळी योग्य त्या गोष्टींची काळजी घेतल्यास हे वाढलेले वजन कमी वेळात कमी होण्यास निश्चितच मदत होईल. पाहूयात त्यासाठी कोणत्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे…..

पायऱ्या चढा

आपल्यातील अनेक जण कुठेही गेले की लिफ्टचा वापर करतात. सध्या सरकत्या जिन्यांचाही ट्रेंड आहे. मॉल आणि रेल्वे स्थानकावरही आता सरकते जिने असल्याने जिने चढणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र जिने चढणे हा उत्तम व्यायामप्रकार असून त्याचा वजन कमी करण्यासाठी चांगलाच फायदा होतो. त्यामुळे कामाशिवायही जिने चढण्याची सवय ठेवल्यास उत्तम

वेट ट्रेनिंगपेक्षा दैनंदिन कामे करताना जड वस्तू उचला

मागील काही वर्षांपासून तरुणांमध्ये वेट ट्रेनिंगचा ट्रेंड वाढला आहे. मात्र त्यापेक्षा दैनंदिन कामांतील वजन उचलल्यास जास्त चांगले. तुम्हाला लहान मूल असेल तर जिथे जाल तिथे त्याला सोबत घेऊन जा आणि कडेवर घेऊन चाला. तुमचे ज्याच्यावर प्रेम आहे अशा बाळाला कडेवर घेऊन चालल्याने तुम्हाला वजन उचलल्याचा ताण येणार नाही. घरातील फर्निचर हलवणे, रद्दी टाकणे, किराणा सामान आणि भाजीपाला आणणे यांसारखी कामे करा. त्यामुळे नकळत वेट ट्रेनिंग होईल.

धार्मिक मोहीमा वाढवा

आपण अनेकदा सुटीच्या दिवसांत वेगवेगळ्य ट्रीपला जातो. अशावेळी चढावे लागेल्याने व्यायाम आणि ट्रीप असे दोन्ही उद्देश साध्य होतात. वैष्णव देवी, गिरनार, काशी ही याचीच काही उदाहरणे आहेत. अशाठिकाणी आपल्यासोबत अनेक जण असल्याने आपण किती चढतो याचा अंदाज येत नाही.

चांगले पदार्थ खा

जेवण सुरु करताना सुरुवातीला प्रथिने असलेल्या गोष्टी किंवा सॅलेड खा. त्यानंतर पोळी-भाजी किंवा भात खा. प्रथिनांमुळे लवकर पोट भरल्यासारखे वाटते तसेच दिर्घकाळ भूक लागत नाही. दिवसभरातील खाण्याच्या गोष्टी एकावेळी थोडेच खात जास्त वेळांमध्ये विभागून खा. तुम्हाला गोड काही खावेसे वाटेल तेव्हा फळे, सुकामेवा किंवा कमी कॅलरीज असणारा गोड पदार्थ खा.

सकाळचा नाष्ता चुकवू नका

सकाळचा नाष्ता आरोग्यासाठी अतिशय गरजेचा असतो. रात्रभरानंतर सकाळी पोट रिकामे झालेले असते. त्यामुळे सकाळी नाष्ता करणे आवश्यक असते. अनेकांना आपण कमी खाल्ले म्हणजे लवकर बारीक होऊ असे वाटते. मात्र ही गैरसमज असून असे केल्याचे विपरित परिणाम होऊ शकतात.

भरपूर पाणी प्या

आपल्याला सारखी तहान लागत असेल तर आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास झाला आहे हे वेळीच समजून घ्या. शरीरातील सर्व क्रीया सुरळीत होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्याच्या दिवसात तर जास्त पाणी प्यायल्याने अनेक समस्या कमी होतात. शरीरातील नको असलेले घटक बाहेर फेकण्यासाठी पाण्याचा चांगला उपयोग होत असल्याने पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.