साहित्य :
३ वाटय़ा भरून शिजलेला भात (शक्यतो बासमती.)
२ मोठे टोमॅटो, बारीक चिरून.
३ ते ४ मोठय़ा लसूण पाकळ्या, मध्यम तुकडे.
२ चमचे तेल किंवा तूप
२ चिमूट जिरे
१/८ चमचा हिंग
२ हिरव्या मिरच्या
७-८ कढीपत्ता पाने
चवीपुरते मीठ
कोथिंबीर बारीक चिरून.

कृती :
१) कढईत तूप गरम करून त्यात सर्वात आधी लसूण घालावी. मोठय़ा आचेवर परतावे. लसणीच्या कडा ब्राऊन झाल्या पाहिजेत आणि लसणीचा कच्चा वास जाऊन छान सुगंध आला पाहिजे.
२) लसूण परतली गेली की जिरे, हिंग, हिरवी मिरची आणी कढीपत्ता घालून थोडा वेळ परतावे.
३) चिरलेले टोमॅटो फोडणीस घालावे, बरोबर मीठही घालावे. झाकण ठेवून मोठय़ा आचेवर परतावे. टोमॅटो पूर्ण मऊ होऊन कडेने तेल सुटले पाहिजे.
४) यात शिजलेला भात मोकळा करून घालावा आणि मिक्स करावे. टोमॅटोचा तयार मसाला सर्व भाताला व्यवस्थित लागला पाहिजे. झाकण ठेवून दोन-तीन मिनिटे मध्यम आचेवर वाफ काढावी.
कोथिंबिरीने सजवून गरमच सव्‍‌र्ह करावे.

टीपा :
हिरव्या मिरच्यांऐवजी लाल सुक्या मिरच्यासुद्धा वापरू शकतो.
लसूण व्यवस्थित परतली गेली पाहिजे (करपू देऊ नये.) जर लसूण कच्ची राहिली तर तेवढी चांगली चव भाताला येत नाही.
ताजे, लाल, आणि पूर्ण पिकलेले टोमॅटो वापरावेत. त्यामुळे रंग आणि चव दोन्ही छान येते.
आवडीप्रमाणे गरम मसाला घालू शकतो. चव छान लागते. पण गरम मसाल्याने टोमॅटोचा स्वाद नाहीसा होतो.

नवरत्न पुलाव

साहित्य :
४ वाटय़ा शिजलेला बासमती भात
(मोकळा शिजवावा)
तूप ल्ल १/४ वाटी फरसबीचे तुकडे
१/४ वाटी गाजराचे तुकडे
३-४ फ्लॉवरचे लहान तुरे
१/४ वाटी मटार
२ चमचे काजू ल्ल २ चमचे बदाम
२ चमचे बेदाणे ल्ल १/४ वाटी पनीर
५-६ ग्लेझ चेरीज (पाकवलेल्या)
खडा मसाला : २ काळी मिरी, २ हिरवी वेलची, १ काळी वेलची, १ लवंग, १ दालचिनी, १-२ तमालपत्र.
१ चिमटी केशर २ चमचे गरम दुधात कालवून घ्यावे.
चवीपुरते मीठ.

कृती :
१) फरसबी, गाजर, फ्लॉवर आणि मटार अर्धवट वाफवून घ्यावेत.
२) कढईत ३-४ चमचे तूप गरम करावे. त्यात अर्धवट वाफवलेल्या भाज्या थोडय़ा परतून बाजूला काढाव्यात. बदाम-काजू तळून घ्यावेत. पनीर थोडे लालसर तळून घ्यावे. बाजूला काढावे.
३) त्याच तुपात खडा मसाला परतावा. सर्व भाज्या, काजू-बदाम-बेदाणे, पनीर आणि ग्लेझ चेरीज घालाव्यात. मीठ घालावे. भात घालून छान मिक्स करावे. केशराचे दूध घालून एक हलकीशी वाफ काढावी.
लगेच सव्‍‌र्ह करावे.

व्हेजिटेबल कोफ्ता बिर्याणी

साहित्य :
३ वाटय़ा बासमतीचा भात (मोकळा)
२ मोठे कांदे, उभे पातळ चिरून
१ मोठा टोमॅटो, किसून

कोफ्त्यासाठी :
१ मध्यम गाजर
१ बटाटा, उकडून, सोलून घ्यावा.
४-५ फरसबी, बारीक चिरून.
२-३ फ्लॉवरचे तुरे, बारीक किसून.
५० ते ७० ग्राम पनीर, कुस्करून.
ब्रेड क्रम्ब्ज ल्ल चवीपुरते मीठ.
१/२ चमचा आले-लसूण पेस्ट.
१/२ चमचा धनेजीरे पूड.
१/२ वाटी कोथिंबीर, बारीक चिरून.
१/२ चमचा बारीक चिरलेली मिरची.

इतर साहित्य :
२ चमचे भिजवलेले काजू
२ चमचे दही ल्ल २ चमचे साय
१/४ चमचा धणे-जिरेपूड
१/४ चमचा कसुरी मेथी
१/४ चमचा गरम मसाला,
तळण्यासाठी तेल.
खडा मसाला : २ तमालपत्र, ३-४ काळी मिरी, २ लवंग, १ दालचिनी काडी, २ वेलची,
१/४ वाटी चिरलेला पुदिना. ल्ल चवीपुरते मीठ
१/४ वाटी दूध + १ चिमटी केशर +
१/४ चमचा हळद एकत्र करून गरम करावे.

कृती :
१) कोफ्त्यासाठी गाजर किसून घ्यावे. नंतर बारीक चिरलेली फरसबी, किसलेला फ्लॉवर आणि थोडे मीठ घालून अर्धवट वाफवून घ्यावे.
२) वाफवलेल्या भाज्या, मिरची, उकडून किसलेला बटाटा, पनीर, धने-जिरे पूड, कोथिंबीर, मीठ आणि ब्रेड क्रम्ब्ज एकत्र करून गोळा बनवावा. छोटे गोळे तयार करून तेलात तळून घ्यावेत.
३) त्याच तेलात उभा चिरलेला कांदा तळून घ्यावा. थोडा सजावटीसाठी बाजूला काढावा. बाकीचा कांदा आणि भिजवलेले काजू मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून पेस्ट करून घ्यावी. टोमॅटो बारीक किसून घ्यावा.
४) कढईत २ चमचे तेल गरम करावे. त्यात खडा मसाला घालून परतावे. नंतर १ चमचा आले-लसूण पेस्ट घालावी. त्यावर किसलेला टोमॅटो घालून परतावे. नंतर कांद्याची पेस्ट आणि थोडे पाणी घालून शिजू द्यावे.
५) त्यात दही आणि फेटलेली साय घालावी. ग्रेव्हीला थोडा दाटपणा आला की त्यात पुदिना, तळलेला कांदा आणि भात घालून हलके मिक्स करावे. वर कोफ्ते अलगदपणे ठेवावे. दूध-केशर मिश्रणाचा हबका वरून मारावा. मंद आचेवर झाकून वाफ काढावी. गरज वाटल्यास कढईखाली तवा ठेवावा जेणेकरून तळाला चिकटणार नाही.
वैदेही भावे – response.lokprabha@expressindia.com