पेटीएमच्या ग्राहकांना केवायसी करावी लागेल असं सांगत मोबाईलवर मेसेज पाठवण्यात येत असून, त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना लुबाडण्यात येत असल्याचे प्रकार समोर येत आहे. असे कुठलेही मेसेज पेटीएम पाठवत नसून, एकदा केलेली केवायसी प्रक्रिया कायमस्वरुपी असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

तुमच्या पेटीएमच्या केवायसीची मुदत संपली असून, पुन्हा केवायसी करावी लागेल अन्यथा २४ तासांत पेटीएम ब्लॉग करण्यात येईल असा मेसेज अज्ञातांकडून पाठवण्यात येतो. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अमुक नंबरवर फोन करा असेही सांगण्यात येते. पेटीएम अकाउंट ब्लॉक होईल या भीतीनं त्या क्रमांकावर फोन करणाऱ्यांना टीम व्ह्यूआरक्यूएस अथवा त्या स्वरुपाचे अॅप डाऊनलोड करण्यास व त्यानंतर ओटीपी अथवा तत्सम बाबी सांगण्यात येतात.

ग्राहकानं विश्वासानं दिलेली माहिती घेऊन त्याला लुबाडण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पेटीएमशी संपर्क साधला असता त्यांनी पेटीएम कुठल्याही प्रकारचे या स्वरुपाचे मेसेज पाठवत नसून, एकदा केली केवायसी प्रक्रिया कायमस्वरुपी असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच अशा फ्रॉड मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहनही कंपनीने केलं आहे. तर पेटीएमच्या नावावर असे मेसेज येत असतील, तर सावध रहा व ओटीपी वा तत्सम कुठलीही माहिती फोनवर शेअर करू नका, असं कंपनीनं म्हटलं आहे.