फ्रीडम 251 स्मार्टफोनचा फाउंडर मोहित गोयल पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी एका ड्राय फ्रूट घोटाळ्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. मोहितवर ड्राय फ्रूट बिजनेसच्या नावाखाली देशतील विविध भागांत 200 कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. नोएडा पोलिसांनी ड्राय फ्रूट घोटाळ्यात व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी रविवारी त्याला व त्याच्या चार सहकाऱ्यांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी नोएडा सेक्टर-62 मध्ये कोरेंथम टॉवरमध्ये दुबई ड्राय फ्रूट्स आणि स्पाईस हब नावाची कंपनी उघडली होती. जांगिडला या कंपनीचा एमडी बनविले होते. तर मोहित या कंपनीचा प्रमोटर होता. दोघे देशभरातून सुका मेवा, डाळ, तेल, मसाले आदी खरेदी करायचे. विक्रेत्यांचा विश्वास जिंकण्यासाठी ते त्यांना काही प्रमाणावर आगाऊ पैसे देत असत. यानंतर विक्रेत्यांकडून लाखो रुपयांचा माल उचलायचे, मात्र त्यानंतर ते विक्रेत्यांना पैसे देत नव्हते, किंवा त्यांनी दिलेला चेक बाउन्स व्हायचा. ही फसवणूक जवळपास 500 कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुबई ड्राय फ्रूट्स आणि स्पाईस हबच्या 14 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात व्यापारी रोहित मोहन यांनी तक्रार केली होती. त्यानंतर हा घोटाळा उघड झाला आहे. याशिवाय पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि अन्य राज्यांमधूनही यांच्याविरोधात 40 पेक्षा जास्त तक्रारी आल्या. 2018 पासून हा धंदा सुरु केला होता. 2015 मध्ये केवळ 251 रुपयांत अँड्रॉईड फोन देण्याच्या नावाखालीही मोहित गोयलने अनेकांची फसवणूक केली होती. त्यावेळीही त्याला अटक झाली होती.