20 September 2019

News Flash

Friendship day 2018: तुटलेली पण तरीही मनात रुतलेली मैत्री…

काळ, दिवस कितीही बदलले तरीही मैत्री मात्र कधीच बदललेली नाही आणि बदलणारही नाही.

Friendship day 2018, वाद आणि मैत्रीचा नाद

Friendship day 2018. ‘यारो दोस्ती बडी ही हसीन है…’ हे गाणं असो किंवा ‘तेरे जैसा यार कहाँ…’ हे गाणं असो. काळ, दिवस कितीही बदलले तरीही मैत्री मात्र कधीच बदललेली नाही आणि बदलणारही नाही. अर्थात तिच्या व्याख्या आणि आपल्या आयुष्यात असणारं स्थान मात्र काहीसं बदललं हेसुद्धा नाकारता येणार नाही. शिशुवर्गात प्रवेश केल्यानंतर आपल्याप्रमाणेच एखादा रडवेला चेहरा करुन बसलेला मित्र किंवा मैत्रीण कधी आपली खास होऊन जातात हे कळतही नाही.

आता तुम्ही म्हणाल की इतक्या लहान वयात कुठे आली खास वगैरेची समज. पण, मुळात त्याच वयापासून मैत्रीच्या नात्याची गणितं नकळतच आपल्याला उमगलेली असतात. पुढे जाऊन एकमेकांना टाळी देऊन एखाद्या गोष्टीची दाद देण्यापासून काही चुकलं तर वेळप्रसंगी आपल्याला दटावण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत ही मित्रमंडळी महत्त्वाच्या भूमिकेत असतात. मैत्रीच्या या नात्यात सर्वकाही सुरळीत असून कसं चालेल बुवा? यात थोडा रागरुसवा, इर्ष्या ही येतेच. कितीही नाकारलं तरीही बहुतांशजणांना या टप्प्यातूनच जावं लागतं. यातूनच काही वाद किंवा मतभेद इतके विकोपाला जातात की, आजन्म सोबत राहण्याच्या शपथा दिलेल्या या नात्याला कधी तडा जातो कळत नाही.

मुळात नाती आणि एखाद्याच्या भावना या इतक्या नाजूक असतात, ज्यांना बऱ्याच गोष्टींमुळे तडा जाण्याची शक्यता असते. त्यातही तूझी मला गरज नाही, मित्रा हीच का यारी…, तू तर मैत्रीसाठी कधी पात्रच नव्हतास/ नव्हतीस माझ्या, असं म्हणून आपण जेव्हा एखाद्या मित्राला किंवा मैत्रीणीला आपण आयुष्यातून वगळतो तेव्हा आपल्या मनाची घालमेल मात्र कोणाच्याच लक्षात येत नसते.

#HappyFriendshipDay: चला पुन्हा कट्टी-बट्टीकडे, कारण…

मित्राशी किंवा मैत्रीणीशी कोणी इतक्या रागाने वागतं का, असाच प्रश्न समोरच्यांकडून मांडला जातो. पण, त्याचवेळी आपल्या मनावर किती घाव झालेले असतात याची जाणीवही समोरच्यांना होत नसते. कारण, मुळात मैत्रीचं नातं जपणं हे कौशल्य प्रत्येकालाच अवगत असतं असं नाही. असं असलं तरीही ते कौशल्य सरत्या दिवसाकडून शिकण्यासाठीही अनेकांचीच धडपड असते. कारण, तुटलेल्या पण, मनात रुतलेल्या मैत्रीचाच एक अदृश्य धागा असतो जो या नात्याचं बंध टिकवून ठेवण्यास समर्थ असतो. अबोला असला तरीही त्यातही वेगळीच आपुलकी असते. अन् कित्येक वर्षांनी किंवा दिवसांनी त्याच मतभेद झालेल्या मंडळींचा चेहरा समोर आला किंवा अनभिज्ञपणे त्यांच्यासमोर आपण आलो, की काहीशा संकोचलेपणाने का असेना, पण आलिंगन देण्यासाठी नव्या नात्याची साद ऐकण्यासाठी आपली मनं पुढे गेलेली असतात. तर मग ही मैत्री नाही, तर आणखी काय?

sayali.patil@loksatta.com

First Published on August 5, 2018 2:45 am

Web Title: friendship day 2018 friends disputes and its effects on relation of friendship