फ्रेंडशिप डे.. मैत्रीचा दिवस.. तसं तर तिला सेलिब्रेशनसाठी काही विशेष कारण लागत नाही. अगदी छोट्या-छोट्या गोष्टीसुद्धा तिला सेलिब्रेट करायला, आनंद व्यक्त करायला खूप आवडतं. पण या फ्रेंडशिप डेला सेलिब्रेट करण्यासाठी तिला एक नवीन मित्र भेटला. अगदीच मित्र नाही म्हणता येणार. कारण काहीएक दिवसांचीच ओळख होती. ओळख म्हणजे एकाच ऑफीसमध्ये आणि एकाच डिपार्टमेंटमध्ये काम करतात म्हणून झालेली ती ओळख. त्यातही आधीच्या ऑफीसमध्येही ते एकत्रच काम करायचे, फक्त डिपार्टमेंट वेगळे होते. पण तिथे कधी एकमेकांचा चेहरा बघून किमान स्माइलही त्यांनी एकमेकांना दिली नसणार. पण या नव्या ऑफीसमध्ये ती फार कमी दिवसांत चांगलीच रुळली. तिच्या वाढदिवसानंतर काही दिवसांतच फ्रेंडशिप डे येतो. बरं मी ती किंवा तो म्हणण्यापेक्षा त्यांना काही नाव देऊया. ती आहे वेदा आणि तो आदित्य. आदित्यच्या ऑफीसमध्ये दोन महिन्यांपूर्वी वेदा रुजू झाली. वेदाच्या बर्थडेनंतर दोघं एकमेकांशी हळूहळू चॅटवर बोलू लागले.

वेदाच्या बर्थ- डे पार्टीसाठी ऑफीसच्याच मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा सुरू झाली. पण बरेच प्लॅन्स वर्कआऊट होण्याआधीच त्यातून एक- एक जण बाहेर पडू लागतो आणि प्लॅन फक्त प्लॅनच राहून जातो. बर्थ- डे पार्टीसाठी उत्सुक होते ते फक्त वेदा आणि आदित्यच. विशेष म्हणजे ज्या सुट्टीच्या दिवशी त्या दोघांनी प्लॅन केला, तो होता फ्रेंडशिप डे. आता हा योगायोग म्हणा किंवा त्यांची डेस्टिनी. एकमेकांबद्दल फारसं काही माहित नसतानाही हे दोघं भेटले आणि फ्रेंडशिप डे साजरासुद्धा केला. तर अशी झाली त्यांच्या मैत्रीची सुरुवात. हो.. मैत्री इथे म्हणू शकेन, कारण त्यादिवशी आदित्यने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी वेदाला सांगितल्या होत्या. नवीन मित्र भेटला म्हणून वेदासुद्धा खूप खूश होती. त्यादिवशी रात्री झोपण्यापूर्वी आदिने तिला व्हॉट्स अॅप मेसेज केला.. ‘हॅपी फ्रेंडशिप डे..नई दोस्त, पुढचे सगळे फ्रेंडशिप डे असेच जाऊ दे!’ हा मेसेज वाचून झोपतानाही वेदाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं.

Rohit Sharma Returns As Mumbai Indians Captain In Mid Match
Video: रोहित शर्मामधील ‘कर्णधार’ परत आलाच; मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या षटकात हार्दिकला बाजूला सारून काय घडलं?
Salman Khan house firing incident
Salman Khan Firing Case : पनवेलमध्ये वास्तव्य, वांद्र्यात रेकी आणि पोर्तुगालमधून धमकी, गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा
muramba fame shivani mundhekar and nishani borule meet indian captain rohit sharma
भारतीय कर्णधार रोहित शर्माला भेटल्या ‘मुरांबा’ फेम रमा अन् रेवा, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंबरोबरचे फोटो व्हायरल
vanita kharat and prithvik pratap dances on salman khan old song
Video : सलमान खानच्या गाण्यावर वनिता खरात अन् पृथ्वीक प्रतापचा ऑस्ट्रेलियात जबरदस्त डान्स! व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

आता वेदा आणि आदी दररोज चॅट करू लागले. जमेल तसं बाहेर भेटूही लागले. आदित्यच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी वेदाला आता समजू लागल्या होत्या. पण वेदा तिच्या आयुष्यातील काहीच सांगत नसल्याची त्याची सतत तक्रार असायची आणि हे बऱ्याच अंशी खरंच होतं. वेदा तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये मुक्तपणे वावरत जरी असली तरी वैयक्तिक आयुष्याबद्दल ती फार काही कोणाला सांगत नव्हती. पण आदित्य त्याच्या छोट्या- छोट्या गोष्टीही तिला सांगायचा. एरवी शांत, लोकांमध्ये न मिसळणारा आदित्य तिच्यासोबत असताना मनमोकळेपणाने वागायचा. दोघांच्या फार काही तक्रारी, भांडणंही नव्हत्या. म्हणूनच ती दोघं एकमेकांमध्ये लवकर रुळली. इतकी की सकाळी उठल्यापासून ते रात्री एक- दोन- तीन वाजेपर्यंत ते दोघं चॅटवर तर कधी फोनवर बोलत असत. कदाचित दोघांना एकमेकांची सवय झाली होती. फिरायची आवड दोघांनाही असल्याने एकेदिवशी त्यांनी अलिबागला जायचं ठरवलं. कारण समुद्रकिनारा दोघांनाही वेड लावणारा होता. निवांत समुद्रकिनारी लाटांचा आवाज ऐकत चंद्र- ताऱ्यांना बघत दोघेही बसले होते. पण यावेळी आदित्य जरा शांतच होता. कसल्यातरी आठवणींमध्ये तो गुंतला होता. त्या रात्री आदित्य वेदाला आपल्या घट्ट मिठीत घेऊन झोपला. त्याला कोणाची तरी साथ हवी होती, कोणीतरी आपलं म्हणून जवळ घेणारं हवं होतं, म्हणून वेदानेही नकार दिला नाही. दोघंही एकमेकांच्या मिठीत शांत विसावले होते.

अलिबागच्या ट्रिपनंतर आदित्य आणि वेदा ऑफीसमधला आणि ऑफीसनंतरही जमेल तितका वेळ सोबतच राहू लागले. रात्रंदिवस चॅट, फोनवर गप्पा, भटकंती या सर्व गोष्टी चालूच होत्या. पुढच्या दोन- तीन नाइट- आऊट ट्रिपमध्ये आदी- वेदा एकमेकांच्या जवळ येऊ लागले. त्यांचं नातं आता मैत्रीपेक्षाही थोडं पुढे गेलं होतं. पण आता वेदाच्या मनात कुठेतरी प्रश्न निर्माण होऊ लागले. ऑफीसमध्येही तिची चिडचिड आदित्यला दिसू लागली. वेदाची ती चिडचिड काही अंशी स्वाभाविकच होती. कोणत्याही अटी- शर्तींविना जरी आदित्यसोबत मैत्री ठेवली तरी दोघांच्याही मनात थोडीफार प्रेमभावना होतीच. पण प्रेम कबुल करण्याची हिम्मत दोघांमध्येही नव्हती. कारण आदित्यच्या आयुष्यात अजूनही त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचं महत्त्व आहे हे वेदा खूप चांगल्या प्रकारे जाणून होती.

‘फ्रेंड्स विथ बेनिफिट्स’ अशी नकळत जरी या नात्याची ओळख झाली असली तरी वेदाला आदित्यच्या गोष्टी खटकू लागल्या होत्या. कारण शारिरीकरित्या जरी ते दोघं जवळ आले असले तरी भावनांचा गुंताही रोखणं शक्य होत नाही. पूर्वीसारखी एकमेकांशी हजारो गोष्टी शेअर करणारे वेदा आणि आदी आता फक्त भांडू लागले. आदित्यने फक्त त्याच्या फायद्यासाठी किंवा त्यांचा एकलकोंडेपणा दूर व्हावा यासाठी मैत्री ठेवली असं वेदाला वाटू लागलं. दोघांमध्ये टोकाचे वाद होऊ लागले आणि त्याचा परिणाम ऑफीसमध्ये कामावरही होऊ लागला. आधी मैत्री आणि त्यानंतर थोडीफार जवळीक याचा भविष्यात त्रासदेखील होईल याची कल्पनाच कोणाला नव्हती. कारण तुम्ही कितीही प्रॅक्टिकल वागण्याचा प्रयत्न केलात तरी भावनांना दूर करू शकत नाही. एकमेकांच्या भावनांचा आदर करत जर योग्य वेळी ‘फ्रेंड्स विथ बेनिफिट्स’मधला ‘बेनिफिट्स’ वेगळा काढला तरी ते नातं जास्त काळ टिकू शकेल, असं मला वाटतं.

एक्स गर्लफ्रेंड पुन्हा आयुष्यात येत असताना आदित्य वेदाच्या मैत्रीला मात्र टिकवू शकला नाही. अशाच एका टोकाच्या वादात दोघांनीही कायमचं एकमेकांशी असलेलं नातं तोडलं. ते भांडण इतकं टोकाचं होतं की दोघांनी व्हॉट्स अॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, कॉल अगदी सगळीकडून एकमेकांना ब्लॉक केलं होतं. फ्रेंड्स विथ बेनिफिट्स हे नातं साधं वर्षभरही टिकू शकलं नव्हतं. किमान मैत्रीही राहिली नाही याची खंत दोघांमध्येही सतत राहिली.

पुढच्या फ्रेंडशिप डे ला ते दोघं एकत्र येतील की नाही हे माहित नाही. पण प्रत्येक फ्रेंडशिप डेला त्यांना एकमेकांची मैत्री नक्कीच आठवेल. कारण मैत्रीपेक्षा सुंदर नातं या जगात दुसरं कुठलंच नाही. काय मंडळी, बरोबर ना?

swati.vemul@indianexpress.com