21 October 2019

News Flash

Friendship day 2018 : प्रवासाने शिकवलेली मैत्री… माणसांशी आणि निसर्गाशी

कित्येकदा तर अवघ्या काही तासांची मैत्री, ओळख आपल्याला कित्येक वर्ष जुनी वाटते.

friendship day 2018 प्रत्येक प्रवासात मला आपलं असं मैत्रीचं नातं गवसत गेलं. (© छायाचित्राचे सर्व हक्क सुरक्षित)

‘कबीरा’, ‘भटक्या’, अगदी ‘उडाणटप्पू’ अशा काही विशेषणांचा एखाद्या फिरस्तीवेड्याच्या किंवा फिरस्तीवेडीच्या घरात सर्रास वापर होतो. मुळात मीसुद्धा त्यातलीच एक. पण, मला ही विशेषणं आता हवीहवीशी वाटू लागली आहेत आणि त्यामागचं कारण ठरत आहे ते म्हणजे ‘प्रवास’. विविध ठिकाणं, त्यांचं महत्त्वं, तिथली जीवनशैली आणि राहणीमान, निसर्ग या सर्व गोष्टींनी माझ्या मनावर नेहमीच राज्य केलं. मुळात याच प्रवासाने मला मैत्रीही शिकवली. मैत्री माणसांशी, आपली भाषा कळत नसलेल्या लोकांशी, मैत्री निसर्गाशी, दगडांशी, डोंगराशी, पाण्याशी, रस्त्यावरल्या मातीशी, गाडीच्या चाकामुळे उधळलेल्या धुळीशी. मैत्री असंख्य जणांशी….

वय वाढत गेलं तसतशी माझी प्रवासाची आवडही वाढत गेली. गडकिल्ले म्हणू नका किंवा बर्फाळ प्रदेश, प्रत्येक ठिकाणी जाण्याचा मानस मी मनात बाळगत होते, आहे आणि यापुढेही बाळगत राहीन. या साऱ्या प्रवासात माझ्यासोबत कोण असो वा नसो, पण या वाटा, दगड, धूळ, डोंगर नक्कीच असतील. मी नाव घेतलेल्या बऱ्याच गोष्टींमध्ये निर्जीव वस्तूंचीच संख्या जास्त आहे. पण, त्यामध्येही जीव असतो हे तुम्हाला त्यांच्याशी मैत्री झाल्यानंतरच उमगेल.

आतापर्यंत मी जो काही प्रवास केला त्यात मला अनेक असे चेहरेही भेटले ज्यांच्याकडे पाहून ही माणसं आणि त्यांचे आयुष्याकडे पाहण्याचे दृष्टीकोन किती वेगळे असतात याची अनुभूती झाली. मग एखाद्या ट्रेकमध्ये भेटलेली एक मैत्रीण असो किंवा, अतरंगीपणाचा कळस करणारा एखादा मित्र असो. प्रत्येक प्रवासात मला आपलं असं मैत्रीचं नातं गवसत गेलं. मुळात प्रवासवेड्या मंडळींसाठी मैत्रीचं नातं करणं, किंवा ते टिकवणं ही अतिशय सहज बाब असते, या मताची मी आहे. अर्थाच हे माझं मत आहे, त्याच्याशी सर्वजण सहमत असतीलच असं नाही.

वाचा : Friendship day 2018: तुटलेली पण तरीही मनात रुतलेली मैत्री…

प्रवास कितीही काळासाठी किंवा कुठेही केलेला असो, तो आपल्यासोबत एक आठवणींचं पोतं सोबत आणतोच. या पोत्यात आठवणींच्या गर्दीत एखादा भन्नाट मित्र किंवा मैत्रीण दडलेली असेल तर त्यात अप्रूप वाटण्याचं कारण नाही. कित्येकदा तर अवघ्या काही तासांची मैत्री, ओळख आपल्याला कित्येक वर्ष जुनी वाटते. अनुभव, आवडी-निवडी आणि इतरही काही गोष्टींविषयी बोलताना आपण कधी एका सुरेख अशा नात्यात गुंतत जातो याचा अंदाजही येत नाही. मग त्याच प्रवासातून निघतेवेळी ‘चल यार फिर मिलेंगे दुनिया छोटी है…’ असं म्हणत दिलेलं वचनही आपल्याला एखादं वरदानच वाटू लागतो. प्रवास संपलेला असतो, पण मनाला आस लागून राहिलेली असते ती म्हणजे ‘त्या’ मित्राला, मैत्रीणीला पुन्हा भेटण्याची.

कित्येकदा, तर वर नमूद केलेल्या निर्जीव गोष्टीसुद्धा आपल्याला एखाद्या जिवलग मित्राप्रमाणे खुणावत असतात. राहता राहिली गोष्ट प्रवासात भेटलेल्या काही व्यक्तींची तर त्यातील निम्मे तर आपल्या आयुष्यात कधी पुन्हा भेटतील अशी पुसटशी कल्पनाही नसते. असते ती फक्त त्यांची एखादी आठवण, एखादा सेल्फी (हल्ली त्याची सोय आहे ते बरं), किंवा मग एखादा किस्सा. ज्याच्या बळावर ती मंडळी आपल्या खास मंडळींच्या यादीत जाऊन बसतात आणि नकळतच मनातून हाक येते, ‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’.

sayali.patil@loksatta.com

First Published on August 5, 2018 9:42 am

Web Title: friendship day 2018 travelling and friendship an unbreakable bond