27 February 2021

News Flash

चाळीपासून टॉवरपर्यंत…

चाळसंस्कृतीतील व्यक्तीला टॉवरमधली जीवनपद्धती अंगवळणी पडायला बराच काळ लागतो.

आज मुंबईत चाळसंस्कृती ते टॉवरसंस्कृती अशी घरांची विविधता आहे.

चर्चा
गायत्री हसबनीस – response.lokprabha@expressindia.com

बरीच वर्षे चाळसंस्कृतीत मुरलेली व्यक्ती टॉवरमध्ये रहायला जाते तेव्हा तिथली जीवनपद्धती तिच्या अंगवळणी पडायला बराच काळ जावा लागतो.

घर म्हणजे सर्वाचा जिव्हाळ्याचा विषय. घर लहान असो वा मोठं, प्रत्येकासाठी ते खूप स्पेशल असतं. आज मुंबईत चाळसंस्कृती ते टॉवरसंस्कृती अशी घरांची विविधता आहे. एकीकडे टॉवर बांधून नवं शहरीकरण होत आहे तर दुसरीकडे चाळसंस्कृती कशी लोप पावत जात आहे याचं किंचित दु:खही वाटतंय. पण त्याच वेळी चाळीच्या जागेतच आपल्याला नवं घर बांधून मिळणार असा आनंदही काहींच्या चेहऱ्यावर आहे. कॉलनीतून किंवा चाळीतून टॉवरमध्ये राहायला गेल्यावर राहणीमानात खूप बदल होतो. बरीच वर्ष तिथे असलेली सवय टॉवरमध्ये राहायला गेल्यावरही सतत आठवत राहते. चाळसंस्कृती कुणाच्या मनातून अजून गेलेली नाही याची प्रचीती वारंवार येत असते. कारण त्या संदर्भातले उल्लेख नातेवाईक किंवा इतर ओळखीतल्या लोकांच्या बोलण्यातून सतत येत असतात. कारण त्यांनी मुंबईतली चाळसंस्कृती अनुभवलेली असते.  आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये चाळसंस्कृतीतून माणसे कशी एकत्रित राहतात यावर रंजक पद्धतीने भाष्य केलं आहे. शाळेत असताना ‘आमचं घर’ या विषयावर निबंध असायचा. त्यात आपण सगळ्यांनीच घराविषयीच्या भावना त्या वेळी मांडल्या असतील. नामवंत लेखकांनीही चाळीतल्या गमतीजमती आपल्या लेखनातून मांडल्या आहेत.  त्यामुळे प्रत्येक जण चाळसंस्कृतीवर व्यक्त होताना दिसतं. कॉलनीत किंवा चाळीत राहण्याची एक वेगळी सवय असते. ती आता टॉवरसंस्कृतीमुळे काहीशी बदलताना दिसतेय. गंमत म्हणजे टॉवरमध्ये राहणाऱ्यांचं इतरांना बरंच अप्रुप असतं. टॉवरमध्ये राहणाऱ्यांना मात्र पुन्हा कॉलनीत जाण्याची इच्छा असते. मलाही टॉवरसारख्या मोठय़ा इमारतीत गेल्यावर परत कॉलनीकडे वळावंसं वाटलं.

आज चाळ, कॉलनी पाडून त्यावर मोठय़ा इमारती उभ्या होत आहेत. ती मोठी इमारत होईपर्यंत दुसरीकडे राहणं भाग पडतं. मीसुद्धा कॉलनीतून मोठय़ा इमारतीत राहायला गेले. इमारत पूर्ण व्हायला बराच कालावधी जातो व त्या कालावधीत जुनं घर आता कायमचं गेलं व होणारं नवीन घर कसं असेल या भावना मनात येतं होत्या. टॉवरमध्ये गेल्यावर जुन्या कॉलनीतल्या घराची आठवण येतेच. आजच्या घडीला छान घर असावं अशी सर्वाचीच इच्छा असते. घराच्या छोटय़ा छोटय़ा आठवणी मनातला ताणसुद्धा कमी करतात. चाळीत असताना आजूबाजूला शहरातली कौलारू घरं दिसायची पण आज सगळीकडे टॉवर होताना दिसतात. आज नवं घरं बांधणं भाग आहे, असाही काहींचा विचार असतो. आजच्या युगात काही जण नव्या आधुनिक विचारसरणीतही कौलारू बंगले बांधतात. असे बंगले बांधणं शहरातील जागेच्या टंचाईमुळे कठीण आहे.

मी बरीच र्वष कॉलनीत राहिले होते. तिथे शेजाऱ्यांना रोज भेटणं हे ठरलेलं होतं. गप्पांसाठी वेळेचं बंधन नसायचं. तासन्तास गप्पागोष्टी व्हायच्या. टॉवरमध्ये असं एकत्र जमणं थोडं कमी होतं गेलं. कधी कधी एकाच इमारतीत राहून दुरावल्यासारखी भावना वाटते. एकत्र कुटुंबाप्रमाणे सर्वच शेजारी कॉलनीत राहायचे. कॉलनीसारखी मजा टॉवरमध्ये क्वचितच येते. कॉलनीत असताना प्रत्येकाशी एक भावनिक नातं आपोआपच जुळायचं. रोज भेटण्याची सवय होती. कॉलनीत असताना एखादा दिवस जरी कोणी भेटलं नाही तरी अस्वस्थ वाटायचं. तसंच सगळ्यांच्या सगळ्या बातम्या मिळायच्या. सर्वाच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवणारे असे शेजारी हमखास असायचे. सर्वाच्या बातम्या जाणून घेण्यात एक वेगळीच गंमत असायची. त्याचबरोबरीने सणावारालाही एक वेगळीच मजा होती. सण आणि ऋतू बदलत नाहीत पण घरांची रचना बदलली की प्रत्येक सण व ऋतू अनुभवताना वेगळेपण येतं. कॉलनीतला पावसाळा वेगळा होता आणि टॉवरमधला पावसाळा अगदी वेगळा आहे. कॉलनीत एक मोठा कॉरिडोर सर्वाच्या दारासमोर होता परंतु टॉवरमध्ये आल्यावर एकच काय ती बाल्कनी मिळते. एकच कॉरिडोर असल्याने पावसाळा सगळ्यांसोबत अनुभवता आला. टॉवरमध्ये पावसाळ्यात बाल्कनीत एकटं उभं राहायचाही कधी कधी कंटाळा येतो. सणावाराला कोणाला आमंत्रण द्यावे लागत नसे. सर्व जण एकमेकांच्या घरी सणावाराला उपस्थित असायचे, पण टॉवरमध्ये ब्लॉक सिस्टीमच्या नावाखाली असे आपणहून सणावाराला एकमेकांच्या घरी शुभेच्छा द्यायला जाणं कमी झालं. टॉवरमध्ये बऱ्याच प्रमाणात आयुष्य सुखकर होतं, कारण ज्या सोयी टॉवरमध्ये असतात त्या कॉलनीत नसतात. कॉलनीत थोडय़ाफार गैरसोयी होत्या तरी टॉवरमध्ये राहिल्यावर त्या गैरसोयींचीही झालेली सवय सुरुवातीला मोडताना त्रास झाला. आईने घरची एखादी संपलेली गोष्ट आणायला सांगितली तर कॉलनीत असताना पटकन दोन मजले उतरून दुकानातून आणणं सोप्पं होतं. टॉवरमध्ये दहाव्या मजल्यावरून खाली जाताना वर येणाऱ्या लिफ्टची आणि खाली असताना वरून येणाऱ्या लिफ्टची वाट पाहणं कंटाळवाणं वाटतं. कॉलनीत असताना टीव्ही असला तरी गच्चीवर खेळणं हा एक चांगला व्यायामही व्हायचा. आज टॉवरमध्ये राहणाऱ्या मुलांना खेळण्यासाठी जागा शोधावी लागते. एकाच इमारतीत गाडय़ा पार्क करायची सोय असल्यामुळे सतत त्यांचा आवाज असतो. कॉलनीत टॉवरपेक्षा मोकळी जागा असते म्हणून खेळायला चांगले अंगण मिळायचे. टॉवरमध्ये घरं मोठी असतात पण खेळायला मोकळी जागा कॉलनीपेक्षा कमी असते. पत्ते खेळणं, कॅरम खेळणं, बॅडमिंटन खेळणं टॉवरमध्ये कमी प्रमाणात होतंय, कारण अजूनही मेट्रोसारख्या ठिकाणी टॉवरकरता मोकळी जागा कुठेच मिळत नाही. टॉवरच्या बाजूला अजून एक टॉवर अशी लाइन लागली असल्याने जागेचा अभाव आहे.

इतके दिवस टॉवरमध्ये राहिल्यावर मला जाणवलेली एक गोष्ट म्हणजे पहिल्या-दुसऱ्या मजल्यावरच्या लोकांना उंच इमारतींमध्ये राहण्याची इच्छा असते. मलाही टॉवरमध्ये लवकरात लवकर जायची इच्छा होती. मला वाटायचं की उंच इमारतीत वरच्या मजल्यावर शांत ठिकाणी जाऊन राहावं. मी टॉवरमध्ये राहायला गेले तेव्हा मला बाहेरून इमारत आकर्षक वाटली पण टॉवरमध्ये गेल्यावर आतलं बांधकाम मला फार काही आवडलं नाही. सर्व बंदिस्त आणि चारही बाजूंनी फक्त भिंत अशी रचना असल्याने मोकळी हवा मिळत नव्हती. इमारतीच्या रचनेचे कौतुक करावं की इमारतीच्या आर्किटेक्टला त्याची चूक दाखवून द्यावी, हेच समजलं नाही. काही दिवस टॉवरमधल्या गोष्टी माझ्या निरीक्षणास यायला लागल्या. काही तासांसाठी कामापुरतं घर सोडणारी माणसं टॉवरमध्ये राहतात, असं टॉवरमध्ये आल्यावर जाणवलं. कॉलनीसारखी माणसांची वर्दळ मला टॉवरमध्ये आल्यावर कमी अनुभवता आली. आमच्या शेजाऱ्यांची ओळख तर सोडाच पण त्यांच्याशी बोलणंही क्वचितच होत असतं.

काही मोजकी उत्स्फूर्त माणसं नवीन घरात राहायला गेल्यावरदेखील शेजाऱ्यांच्या ओळखी करून घेतात. प्रत्येकाचे शेजारी वेगवेगळ्या वातावरणातून आलेले असतात. पण एकमेकांची ओळख करून घ्यावी, असं त्यांना फारसं वाटत नाही. तर कधी ओळख झालीच तर घाईघाईची भेट असते. मकरसंक्रांतीला कॉलनीत गच्चीवर आम्ही पतंग उडवण्यासाठी भेटायचो परंतु आता टॉवरमध्ये गच्ची नसल्याने ती भेट कमी झाली. कॉलनीत दिवसा सगळ्यांची दारं उघडी असायची व रात्रीच दारं बंद व्हायची. टॉवरमध्ये सगळ्यांच्याच घरांची दारं दोन मिनिटांत बंद होण्याचा आवाज येतो. त्यामुळे टॉवरमध्ये आल्यावर मला एखाद्या गेस्ट हाऊसमध्ये राहिल्यासारखे वाटू लागलं.

पण शेवटी टॉवरमध्ये राहायला आलो तरी परत पहिल्यासारखी बांधिलकी जपली पाहिजे; आत्ता आमच्यासोबत राहणारे टॉवरमधील आमचे शेजारी व आम्ही नेहमी असाच विचार करतो, कारण पूर्वीचे काही शेजारी घर सोडून गेले. नवीन शेजारी त्यांच्या जागी राहायला आले. त्यांनाही आम्ही आमच्यात सामावून घ्यायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे टॉवरमध्येही छान नेटवर्क तयार होईल. पूर्वी एकमेकांना मदत करणारे चाळकरी आज टॉवरमध्ये एकोप्याने राहायचे प्रयत्न करताना दिसत आहेत, हा आशेचा किरण आहे. मुंबईसारख्या ठिकाणीच नव्हे तर इतर शहरांमध्ये पण टॉवरसंस्कृती वेगाने वाढत जाईल. पण ती वाढताना एकोप्याची परंपरा सोडता कामा नये.
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 5:33 pm

Web Title: from chawl to tower lokprabha article
Next Stories
1 भावी इंजिनीअरचं आजचं दु:ख
2 १२ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा लिक ! ‘हे’ क्विझ अॅप वापरताना सावधान
3 सुरवंटाचं फुलपाखरू होताना…
Just Now!
X