डॉ. नितीन पाटणकर – response.lokprabha@expressindia.com

फळांमधली साखर खरंच अपायकारक नसते का, मग फळं भरपूर खाल्लेली चालतात का, ती नेमकी किती खावीत… फळांमधून मिळणाऱ्या साखरेविषयी मधुमेहींच्या मनात असे अनेक प्रश्न असतात.

संत निवृत्तीनाथ महाराजांचा ‘प्रपंच टवाळ वृक्षाचे फळ! उपटले मूळ कल्पनेचे!’ असा एक अभंग आहे. प्रपंच करताना शंका आली तर त्या संसारवृक्षाचे फळ टवाळ फळ म्हणजे अविद्या असते. पण आजकालच्या जगामध्ये माणसं इतकी मायावी झालेली आहेत की शंका घेतलीच नाही तर आपल्याला अविद्या किंवा कुविद्या नक्की प्राप्त होऊ शकेल. सध्या इंटरनेटवर ‘७२ तासांत डायबिटीस बरा करून देतो,’ अशा आशयाची एक व्हिडीओ क्लिप खूप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये एक मजेशीर गोष्ट आहे. एक डॉक्टर समोर उभा राहून प्रेक्षकांना एका परीक्षानळीत घेतलेल्या रक्ताच्या सॅम्पलमधली शुगर ग्लुकोमीटरवर मोजून दाखवतो. मीटरवर आपल्याला साखरेचे रीिडग दिसते ते १०० किंवा १०८. मग तो गृहस्थ त्या परीक्षानळीत ग्लुकोजचं सोल्यूशन घालतो. आता रक्त आणि ग्लुकोज एकत्र झाले आहे. मग पुन्हा ग्लुकोमीटरवर रीिडग घेतले जाते. रीिडग येते २१०. लोक दचकतात. मग तो सांगतो बघा आपण जर  ग्लुकोज खाल्ली तर शंभरचे रीिडग २१० म्हणजे दुप्पट वाढले. यात लोकांना काहीच नवल वाटत नाही. कारण त्यांना माहिती असतं की रक्तातले ग्लुकोज वाढले तर रीिडग वाढणारच आहे. खरा चमत्कार पुढे असतो. मग तो पुढे सांगतो मी आता यामध्ये फक्त ग्लुकोज सोल्युशन टाकतोय. मग अत्यंत नाटय़पूर्ण रीतीने तो ग्लुकोमीटरवर पुन्हा ग्लुकोजचे रीिडग घेतो. रीिडग येते ८०. प्रेक्षक अवाक् होतात. टाळ्यांचा कडकडाट होतो. तेव्हा तो जादूगार सांगतो मी जी साखर आत्ता टाकली ती आहे, फ्रक्टोज. ही फळांमध्ये भरपूर प्रमाणात असते. ही साखर भरपूर सेवन केली तर डायबिटीस निघून जाऊ शकतो. पुढे तो सांगतो की, म्हणून डायबिटीस बरा करण्यासाठी भरपूर फळे खा आणि असे पदार्थ खात जा ज्यात फ्रक्टोज खूप प्रमाणात असेल. त्याचबरोबर तो असेही सांगतो की, आपल्या जेवणातून धान्ये वजा केली आणि कच्च्या भाज्या खायला सुरुवात केली तर मधुमेह किंवा डायबिटीस नाहीसा होऊ शकतो. वरवर दिसायला हे सर्व अत्यंत लॉजिकल वाटले तरी त्यात एक ग्यानबाची मेख आहे. ज्या ग्लुकोमीटरवर रक्तातल्या साखरेचे प्रमाण मोजले जाते, त्यामध्ये फक्त ग्लुकोज मोजण्याची क्षमता किंवा सोय असते. त्या यंत्रामध्ये रक्तातले इतर कुठलेही घटक मोजले जाऊ शकत नाहीत. त्यामुळेच रक्तातली जी फ्रक्टोज साखर आहे ती त्यात मोजली जात नाही. डोळसपणे बघितले तर हा प्रयोग काय दाखवतो? पहिला अर्धा भाग म्हणजे रक्तामध्ये ग्लुकोज मिसळली तर रक्तातील ग्लुकोज वाढते. पुढचा अर्धा भाग जो आहे ज्यामध्ये आपण फ्रक्टोज मिसळून पाणी टाकतो त्या ठिकाणी अगदी नुसते नळाचे पाणी घातले तरी एकूण द्रावण डायल्यूट झाल्यामुळे त्यातील ग्लुकोजची पातळी कमी दिसणार. हा फक्त डायल्युशन इफेक्ट आहे हे लक्षात आले तर मग त्यातील सर्व जादू निघून जाते. सादरीकरण इतके प्रभावी असते आणि त्या जोडीला ७२ तासांत डायबिटीस बरा करण्याची जी घोषणा असते त्यामुळे आपण भारावून जातो व सारासार विचार करीत नाही.

Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
FMCG Sector, share market, Investment Opportunities, Market Trends, Investment Opportunities in FMCG, Market Trends of fmcg, stock market, Fast Moving Consumer Goods, Food and beverages, personal use goods,
क्षेत्र अभ्यास : ‘एफएमसीजी’ : फक्त किराणा नव्हे बरेच काही…
Those who violate the rules of cleanliness will get fine receipt online
मुंबई : स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने दंडाची पावती मिळणार
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

हे करमणुकीचे प्रयोग कशाला, बाकी पण अनेक वैद्य, डॉक्टर डायबिटीसमध्ये खूप फळे खा असे सांगतात. फळे आरोग्याला चांगली असतात, त्याच्यातून विटामिन्स आणि मिनरल्स मिळत राहतात हे खरे असले तरी त्याचा डायबिटीस कमी करण्याशी काहीही संबंध नाही. खरे तर नेहमीचे अन्न कमी करून त्याऐवजी फळांची मात्रा वाढवली तरी शरीराला मिळणाऱ्या कॅलरीज तेवढय़ाच राहून मधुमेदावर किंवा डायबिटीसवर नियंत्रण मिळवता येत नाही.

फळं आरोग्याला अतिशय उपकारक आहेत आणि ती कितीही खाल्ली तरी चालतात असा एक गोड गैरसमज आपल्या सर्वामध्ये असतो. खरे तर फळांमध्ये फ्रक्टोज आणि ग्लुकोज या दोन्ही शर्करांचे किंवा साखरेचे प्रमाण असतेच. त्यामुळे आपण भरपूर फळे खाल्ली तर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते किंवा वाढतेच. यातील फरक तोच म्हणजे फळापासून मिळणारी जी साखर आहे त्याचा मेटाबोलिजम शरीरामध्ये ग्लुकोजपेक्षा वेगळ्या रीतीने होत असतो. ग्लुकोज ही साखर पहिल्यांदा लिव्हरमध्ये जाते आणि तिकडून बाहेर पडल्यानंतर इन्सुलिनच्या साह्यने ती पेशींमध्ये जाऊन मग तिचं उर्जेमध्ये रूपांतर होतं. त्याऐवजी फ्रक्टोज ही लिव्हरमध्ये जाऊन लिव्हरमध्येच उर्जा म्हणून वापरली जाते किंवा तिकडून बाहेर पडली तर इन्सुलिनशिवाय ती पेशींच्यामध्ये जाऊ शकते आणि त्यामुळे तिला इन्शुलिनची गरज जास्त भासत नाही. त्याचबरोबरीने फ्रक्टोज रक्तामध्ये येते आणि रक्तातले ग्लुकोज आपण मोजतो तेव्हा खाल्ल्यानंतर दोन तासांनी साखरेचे रीिडग घेतले तर ते रीिडग खूप कमी दिसते. कारण आपण ग्लुकोज न घेता फक्त ग्लुकोजचे रीिडग घेत असतो. त्यामुळे लोकांना वाटते की फ्रक्टोज शरीरात घेतल्यानंतर डायबिटीसचे प्रमाण कमी होते. खरे तर फ्रक्टोज शरीरात गेली की त्यामुळे रक्तातल्या ट्रायग्लिसराइड्सच्या प्रमाणामध्ये वाढ होते. त्यामुळे फ्रक्टोस खाल्ली आणि रक्तातल्या ग्लुकोजचे प्रमाण वाढलेले दिसले नाही तरीही ट्रायग्लिसराइड्स वाढल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतोच.

मधुमेदावर उपचार करताना एक सर्वसामान्य नियम पाळायला लागतो तो म्हणजे काय जे खाऊ ते माफक प्रमाणातच खायला हवे. हा नियम फळांनाच नाही तर उद्या कोणी अमृताचा कुंभ आणला तर त्यालाही लागू होतो.

फळे खायला मिळणे हा आपल्याकडे आरोग्यापेक्षाही जास्त संपत्तीचा मापदंड मानला जातो की काय असा संशय यायला जागा आहे. सर्वसामान्यांच्या घरी कोणी पाहुणे आले तर साधा चहा ठेवला जातो पण तेच धनिकांच्या घरी गेलो किंवा ज्यांना फळे घेऊन लोकांना द्यायला परवडतात त्यांच्या घरी गेलो तर तिथे आपल्यासमोर फळे आणून ठेवली जातात. फळांमध्येही विविध प्रकार असतात. आंबा हे राजेशाही फळ आहे मधुमेद झाला असता त्याचे सेवन खूप कमी प्रमाणात करावे लागते. त्यातसुद्धा आंबा खाण्याऐवजी आमरस खाल्ला तर त्याबरोबरीने थोडी साखर, तूप आणि एकाऐवजी दोन किंवा तीन आंबे सहज पोटात जातात. कुठलीही फळे खाताना त्याचे काही सर्वसामान्य नियम पाळले तर मधुमेद झाला असताना फळे खाण्याने नुकसान होणार नाही.

फळ निवडताना ते थोडेसे कच्चे असले तर त्याचा फायदा होतो. सालासकट खाता येणारी फळे असतील तर त्याचाही जास्त फायदा होऊ शकतो. सालासकट खाता येणार नसेल तर निदान सालाच्या अगदी जवळचा भागही खाण्यामध्ये घेतला गेला आहे का नाही हे बघणे जरूर असते. दिवसाला फळ केव्हा खावे यालाही काही नियम आहेत. कुठच्याही जेवणाआधी व जेवणानंतर फळ खाऊ नये. दोन खाण्यांच्यामध्ये जेव्हा भूक लागते तेव्हा अबरचबर खाणे पोटात जाते, त्याऐवजी फळ खाल्ले तर फायदा होतो. रोज साधारणपणे २०० ते ३०० ग्रॅम इतक्याच प्रमाणात फळ खाल्ले तर जास्त बरे त्यातही एकच फळ रोज खाऊ नये. एक फळ खाल्ले तर पुढील पाच ते सहा दिवस तेच फळ खाण्याचे टाळावे.

फारशी निगा न राखता तयार होतात ती फळे आरोग्याला जास्त चांगली असतात उदाहरणार्थ विविध प्रकारची बोरे, करवंद अशासारखी फळे. यातील कुठल्याही प्रकारची फळे ही चावून खाणे जास्त श्रेयस्कर.  हल्ली फळांचा रस काढून घेणे किंवा फळांची स्मुदी बनवणे याकडे लोकांचा कल वाढतो आहे. असे केल्याने त्यामध्ये चावण्याचा भाग नसल्याने किती खाल्ले हे मेंदूला पटकन कळत नाही त्याचसोबत एका फळाऐवजी अनेक फळे पोटात गेल्यामुळे एकूण किती कॅलरीज पोटात गेल्यात तेही कळत नाही.

फळे खाताना ती दह्य़ासोबत, दुधासोबत खावीत की न खावीत याबद्दल अनेकांची अनेक मते असतात. मला तर वाटते की दूध, दही किंवा इतर कुठल्याही कॅलरी परिपूर्ण असणाऱ्या पदार्थाबरोबर फळे कधीच खाऊ नयेत.

फळे खाताना आपले उद्दिष्ट काय हे पहिल्यांदा ध्यानात घेतले पाहिजे. विटामिन्स आणि मिनरल्स यांचा स्रोत म्हणून आपण फळे खात असलो तरी ती मर्यादेबाहेर खाणे चुकीचे आहे.

बरेचदा ताजी फळे उपलब्ध नसल्यामुळे पॅक होऊन येणारी फळे आपण खात सुटतो. एरवी लोक सांगतात की आमच्या घरामध्ये आम्ही शिळे खात नाही, पण पॅकबंद शिळे त्यांना चालते. त्यामुळे आरोग्याकरिता प्रयत्न करणाऱ्या लोकांना सहा महिन्यांपूर्वी बाटलीत भरलेला फळांचा रस चालतो.

शेवटी काय कुठलेही अन्न असो फळ असो, किंवा कुठलाही खायचा पदार्थ असो तो कितीही गुणांनी भरलेली असला तरी माफक प्रमाणात सेवन केल्यामुळे सर्व वयाच्या रुग्णांना फायदा होऊ शकतो आणि निरोगी लोकांचा रोगापासून बचाव होऊ शकतो. आहारावर नियंत्रण ठेवतानाच आपण आहारातील बदल कशासाठी करीत आहोत याचा मागोवा घ्यायला हवा. कुठचीही गोष्ट खाताना किंवा ती टाळताना त्यामागे आपला उद्देश काय आहे हे सतत डोळ्यांसमोर राहिले तर तो बदल घडून येऊन वर आपल्याला फायदा होऊ शकतो.

तुकाराम महाराजांनी म्हटले आहे
बीज तेची फळे येईल शेवटी
लाभ हानी तुटी ज्याची तया

त्यामुळे मनसोक्त फळे खाऊन आपली तब्येत बिघडवून घ्यायची की मध्यम प्रमाणात फळे खाऊन आनंद घेत स्वास्थ्य टिकवायचे हा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा असतो.
सौजन्य – लोकप्रभा