03 June 2020

News Flash

प्रिय व्यक्तींना गॅजेट गिफ्ट करताय? हे पर्याय पाहाच

सध्याच्या ‘स्मार्ट’ तंत्रज्ञानाच्या जगात भेट देण्यासाठी ‘गॅजेट’सारखा पर्याय नाही.

सध्याच्या ‘स्मार्ट’ तंत्रज्ञानाच्या जगात भेट देण्यासाठी ‘गॅजेट’सारखा पर्याय नाही. या पाश्र्वभूमीवर आपल्या प्रिय व्यक्तींना भेट देण्यासाठी गॅजेटचे काय पर्याय उपलब्ध आहेत, त्याविषयी जाणून घेऊयात..

पॉवर बँक
स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट वापरणाऱ्यांना सध्या सर्वाधिक गरज असते ती पॉवरबँकची. मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे कितीही जास्त क्षमतेची बॅटरी असली तरी, ती पूर्ण दिवसभर तग धरत नाही. विशेषत: प्रवासादरम्यान मोबाइलची बॅटरी उतरली तर वापरकर्त्यांची मोठी पंचाईत होते. अशा वेळी ‘पॉवर बँक’ हा उत्तम पर्याय आहे. सध्या बाजारात पाच हजार एमएएच पासून २० हजार एमएएच क्षमतेच्या पॉवरबँक उपलब्ध आहेत. जितकी जास्त ‘एमएएच’ क्षमता तितका जास्त वेळ पॉवरबँकच्या साह्याने मोबाइल किंवा अन्य उपकरणे चार्ज करता येतात. यामध्ये नामांकित कंपन्यांपासून देशीविदेशी नवीन कंपन्यांच्या पॉवरबँकही बाजारात मिळतात. साधारणत: पाचशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंतच्या किमतीत स्थानिक बाजारात पॉवरबँक मिळतात. ईकॉमर्स संकेतस्थळांवर पॉवर बँकचे असंख्य पर्याय आहेत. मात्र, किमतीनुसार पॉवरबँक खरेदी करताना त्याची ‘एमएएच’ क्षमता, त्याला असलेले चार्जिग आऊटपूट पोर्ट, तिचा आकार आणि वजन या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

पोर्टेबल स्पीकर
अलीकडच्या काळात ‘पोर्टेबल स्पीकर’ला खूप महत्त्व आले आहे. मित्रमंडळींसोबत बाहेर गप्पा मारत असताना किंवा कुटुंबासमवेत सहलीला गेले असताना संगीताचा आनंद सामूहिकपणे घेण्यासाठी ‘पोर्टेबल स्पीकर’ हा एक उत्तम पर्याय आहे. खिशात मावणाऱ्या छोटय़ा स्पीकरपासून एखाद्या बॅगेच्या आकाराइतक्या दमदार स्पीकपर्यंतचे अनेक पर्याय यात उपलब्ध आहेत. ‘जेबीएल’सारख्या कंपनीचे छोटय़ा आकाराचे स्पीकरही दणदणीत आवाज देतात. ‘पोर्टेबल स्पीकर’ची निवड करताना त्याचा आकार, ध्वनीचा दर्जा, त्यातील बेसची क्षमता, त्यातील बॅटरीची क्षमता, इनपुटचे पर्याय या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. पोर्टेबल स्पीकर साधारण पाचशे रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत.

फिटनेस बॅण्ड
बदललेल्या जीवनशैलीत व्यायाम हा एक महत्त्वाचा घटक होऊ लागला आहे. धावपळीच्या जीवनातूनही थोडा वेळ काढून धावणे किंवा व्यायाम करणे यावर साऱ्यांचा भर असतो. आहारनियंत्रण अर्थात डाएट हाही महत्त्वाचा भाग आहे. या सर्व गोष्टींची व्यवस्थित नोंद ठेवण्यासाठी फिटनेस बॅण्ड उपयुक्त ठरतात. मनगटावर बांधता येण्यापासून बाहूवर बसवता येण्यासारखे अनेक फिटनेस बॅण्ड सध्या बाजारात उपलब्ध आहेत. हे फिटनेस बॅण्ड स्मार्टफोनच्या मदतीने संचलित करता येतात. मात्र, त्याद्वारे हृदयाचे ठोके, रक्तदाब, चालण्याचा वेग, अंतर, वेळ, कॅलरी उत्सर्जन, पाणी पिण्यासाठीचे रिमांइडर अशा असंख्य गोष्टींचे तपशील आपल्याला माहीत करून घेता येतात. तरुणवर्गात तर फिटनेस बॅण्ड प्रचंड लोकप्रिय आहेत. नामांकित कंपन्यांप्रमाणेच नवनवीन कंपन्याही आपले स्वस्त फिटनेस बॅण्ड बाजारात आणत आहेत. त्यामुळे अगदी ८००-९०० रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंतचे फिटनेस बॅण्ड तुम्हाला मिळतील.

हेडफोन
स्मार्टफोनचा अतूट सोबती हेडफोन असतो. प्रत्येक मोबाइलसोबत कंपन्या हेडफोनही पुरवतात. मात्र, त्या हेडफोनमधील ध्वनीचा दर्जा चांगला असेलच याची हमी नसते. याशिवाय बाजारात आता ऑन इअर, इन इअर, नेकबॅण्ड, वायरलेस अशा विविध प्रकारांत आकर्षक हेडफोन उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सुस्पष्ट आणि चांगला ‘बेस’ असलेला ध्वनी देणारा हेडफोन कुणालाही आवडतो. हेडफोनमध्येही अगदी तीनशे रुपयांपासून २० हजार रुपयांपर्यंतचे पर्याय आपल्याला मिळतात. किमतीनुसार त्यांचा दर्जाही वाढत जातो. मात्र, हेडफोनची खरेदी करताना त्यातील आवाज, त्याचा प्रकार, वायरलेस असल्यास ब्लुटुथची अंतरमर्यादा, नेकबॅण्ड असल्यास त्याची रचना या गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

स्मार्ट बाय कार ब्लूटुथ
कारमध्ये बिल्ट इन ब्लूटुथ सुविधा नसेल तर हे भेट देण्यासाठी हे उत्तम गॅजेट आहे. मॅग्नेटिक बेस असलेले हे ब्लूटुथ कारच्या डॅश बोर्डवर अगदी सहज कनेक्ट करता येतं. यामध्ये ब्लूटुथ वर्जन ४.२ असल्यामुळे तुमच्या कारमध्ये गाणी ऐकू शकता. तसंच यामधील बिल्ट इन मायक्रोफोनमुळे कॉलसुद्धा घेता येतात. ब्लूटुथ डिव्हाइस फक्त फ्लिपकार्टवर उपलब्ध असून याची साधारण किंमत ७९० रुपये इतकी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2020 3:44 pm

Web Title: gadget gift options nck 90
Next Stories
1 ग्राहकांचा मोठा ‘प्रॉब्लेम’ झाला दूर, Airtel ने आणले नवीन फीचर्स
2 आला उन्हाळा..अशी घ्या काळजी!
3 Vodafone-Idea युजर्ससाठी ‘बॅड न्यूज’ , एक एप्रिलपासून कॉल-डेटा ७-८ टक्क्यांनी महागणार?
Just Now!
X