एकटे असताना मोबाईलमधील गेम खेळणे एखादवेळी ठिक आहे. पण सार्वजनिक ठिकाणी अनेक लोकांमध्ये असताना किंवा एखाद्या कार्यक्रमातही एकटे बसून गेम खेळण्याचे व्यसन सध्या अनेकांना असते. सुरुवातीला याकडे आजूबाजूचे लोक दुर्लक्ष करतात. पण नंतर ती व्यक्ती लोकांमध्ये बसून अशी गेम खेळायला लागली की वैताग येतो. सुरुवातीला टाइमपास किंवा विरंगुळा म्हणून खेळल्या जाणाऱ्या गेमिंगचं हळूहळू व्यसनात रुपांतर होतं. ‘डब्लूएचओ’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात हे निदान नोदविण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या आसपासचे कोणी अशाप्रकारे मोकळ्या वेळी सतत मोबाईलवर गेम खेळत असतील तर त्यांना नक्कीच एखादा आजार झाला आहे हे लक्षात घ्यावे. दिवसातला थोडा वेळ गेम खेळणे ठीक आहे. पण गेमिंगच्या सवयींना गंभीर आजार म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळे जास्त वेळ गेम खेळणं हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.

‘डब्ल्यूएचओ’नं नुकतीच, विविध आजारांविषयीची माहितीचं संकलन असणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील यादी जाहीर केली आहे. यामध्येही ‘घातक गेमिंग’ (hazardous gaming) आणि ‘गेमिंग डिसऑर्डर’ (gaming disorder) असे दोन प्रकार पहायला मिळतात. गेमिंगची सवय व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम करते. विशेष म्हणजे सध्या केवळ तरुण-तरुणींनाच हा आजार झाला आहे असे नाही तर ज्येष्ठांनाही काही प्रमाणात हा आजार झाल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे या दोन्ही आजारांची वर्गवारी सर्वाधिक व्यसनाधीन विभागांत (addiction disorder sections) करण्यात आली आहे. विशिष्ट गेमच्या पुढच्या लेव्हल्स पार करण्याची उत्सुकता आणि गेम्सचे खेळल्यावर येणारे फीडबॅक असं हे चक्र सतत सुरू राहतं आणि व्यक्ती त्यात जास्त प्रमाणात गुंतून जातो.

या गेमिंगच्या व्यसनामुळे सुरुवातीला ज्यांच्या हातात मोबाईल एक ते दोन तास असतो तो कालावधी नंतर १० ते १२ तासांवर जातो. यामुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. मात्र हे व्यसन गंभीर रुप धारण करण्याच्या आतच योग्य ती काळजी घ्यावी आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा.