चॉकलेट ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी गोष्ट. दिवसातील कोणत्याही वेळी चॉकलेट समोर आले तरीही आपण त्याला नाही म्हणून शकत नाही. काळाप्रमाणे याच चॉकलेटमध्ये बरेच बदल झाले. गणपतीच्या दिवसांत बाप्पाला आवडणाऱ्या मोदकाच्या आकारातही हे चॉलेट मोदक मिळू लागले आहेत. मात्र या विकतच्या मोदकांची किंमत जास्त असल्याने ते जास्त प्रमाणात घ्यायचे असल्यास परवडत नाहीत. अशावेळी घरच्या घरी हे चॉकलेट मोदक करता आले तर? पाहूयात चॉकलेट मोदकांची सोपी आणि चटकन करता येईल अशी रेसिपी

साहित्य :

पाव कप खवा (कोरडा करून घेतलेला)
पाव कप पिठीसाखर
दीड ते दोन चमचे कोको पावडर

कृती :

कोरडय़ा केलेल्या खव्यामध्ये पिठीसाखर एकत्र करून घ्या. एका वेळी एक चमचा कोको पावडर घाला. एकत्र करा. परत एकदा एक चमचा कोको पावडर घाला. मिश्रण थोडे घट्टसर होत नाही तोवर कोको पावडर घाला. मिश्रण घट्ट झाले की, त्याला मोदकांप्रमाणे आकार द्या.