एखाद्या व्यक्तीच्या जनुकीय रचनेवरून त्याचे गुणधर्म, शारीरिक वाढ आणि त्याला भविष्यात होऊ शकणारे आजार यांचा अंदाज लावणारे साधन विकसित करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.

अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीचे संशोधक स्टीफन ह्सू यांच्या गटाने हे तंत्र विकसित केले आहे. त्यासाठी त्यांनी ब्रिटनमधील ५ लाख नागरिकांच्या जनुकीय माहितीचा आधार घेतला. ही माहिती संगणकावर आधारित यंत्रांना पुरवून तिचे विश्लेषण करण्यात आले. इतकेच नव्हे तर ही यंत्रे त्यांना पुरवलेल्या माहितीचा अभ्यास करून स्वत: विचार करू शकतात आणि शिकू शकतात. त्यासाठी संगणकीय अल्गोरिदम्सचा वापर केला आहे. त्यातून ते व्यक्तीच्या भावी शरीररचनेविषयी आणि त्याच्या संभाव्य व्याधींविषयी अंदाज लावू शकतात. त्यांचे हे संशोधन जेनेटिक्स नावाच्या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. या तंत्राच्या आधारे संशोधक व्यक्तीची उंची किती असू शकेल, त्याच्या हाडांची घनता किती असेल, ती व्यक्ती अभ्यासात कशी असेल आदी बाबींचा अंदाज लावू शकते.

व्यक्तीच्या उंचीबाबतचे अंदाज केवळ एखाद्या इंचाच्या फरकाने खरे ठरले आहेत. तर अन्य बाबतीत अद्याप इतकी अचूकता साध्य झाली नसली तरी ढोबळमानाने अंदाज बरोबर आहेत. यासह हृदयरोग, मधुमेह आणि स्तनांचा कर्करोग याबाबतचे अंदाजही  बरेचसे योग्य आहेत. त्यामुळे आता संभाव्य व्याधींचा आधीच विचार करून इलाजांची सोय करता येणे शक्य होईल.