सतत गोंगाट असणाऱ्या रस्त्यांवरून प्रवास केल्याने किंवा विशेषत: रात्रीच्या वेळी वातानुकूलित यंत्रातून बाहेर पडणाऱ्या हवेशी दीर्घकाळ संबंध आल्याने पुरुषांना वंध्यत्व (जनन अक्षमता) निर्माण होण्याचा धोका असल्याचा इशारा एका अभ्यासात करण्यात आला आहे.

दक्षिण कोरियातील सोल राष्ट्रीय विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधन केले. पर्यावरणीय स्थितीचा वंध्यत्वावर होणारा परिणाम या अभ्यासामुळे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जर रात्री आवाजाची पातळी ५५ डेसिबलपेक्षा अधिक (ही पातळी उपनगरातील रस्त्यावरील आवाजाशी समतुल्य) असेल तर वंध्यत्वाच्या लक्षणांमध्ये वाढ होत असल्याचे त्यांना आढळून आले.

ध्वनिप्रदूषण हे आरोग्यविषयक समस्यांशी जोडले गेले आहे. यामुळे हृदयाशी संबंधित तसेच मानसिक आजार निर्माण होतात. तसेच यामुळे सामाजिक वर्तन आणि कार्यक्षमता याच्यामध्ये बदल होतो. या आधीच्या अभ्यासामध्ये ध्वनिप्रदूषणाचा महिलांमध्ये वंध्यत्व निर्माण होण्यासह ध्वनिप्रदूषण आणि जन्मसंबंधी समस्या (अकाली जन्म, गर्भपात, जन्मजात विकृती) निर्माण होत असल्याचे समोर आले होते. नव्या अभ्यासामध्ये रात्रीच्या वेळी ध्वनीच्या कमी पातळीमध्येही पुरुषांवर दीर्घकालीन काय परिणाम होतात याचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये वंध्यत्व कसे विकसित होते हेदेखील अभ्यासण्यात आले.

जगभरात सहा जोडप्यांपैकी एकास त्यांच्या आयुष्यामध्ये कायमची अथवा तात्पुरती वंध्यत्वाची समस्या निर्माण होते. या संशोधनासाठी २० ते ५९ वयादरम्यानच्या दोन लाख पुरुषांचा अभ्यास करण्यात आला.