News Flash

जोखीम टाळण्यासाठी जनुकीय प्रयोगांवर नजर

‘जनुकीय बदल आढावा समिती’ची बैठक जिनिव्हा येथे झाली.

गेल्या वर्षी चीनमध्ये दोन जुळ्या मुलींच्या जनुकीय पेशीत बदल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अशा प्रकारचे जनुकीय बदल (जे पुढील पिढय़ांमध्ये कायम राहतील) करण्याचे प्रयोग थांबविण्याची मागणी केली जात होती. या पाश्र्वभूमीवर मानवी जनुकात बदल करण्याबाबतच्या संशोधनावर नजर ठेवण्यासाठी जागतिक स्तरावर नोंद ठेवण्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘जनुकीय बदल आढावा समिती’ची बैठक जिनिव्हा येथे शुक्रवारी झाली. एकेकाळी जे रोग आपणास उपचारांबाबत असाध्य वाटत होते, त्यांचा प्रतिबंध करण्याची आशा आता नव्या जनुकीय बदलाच्या तंत्रामुळे वाटू लागली आहे. पण त्याचवेळी या तंत्राच्या वापरामुळे नैतिक, सामाजिक, तांत्रिक आणि नियमनविषयक अशी अभूतपूर्व आव्हाने उभी राहण्याची शक्यता आहे, असे या बैठकीत निदर्शनास आणले गेले.

दक्षिण चीनमधील दोन मुलींना ‘एचआयव्ही’ची बाधा होऊ नये, या उद्देशाने त्यांच्या जनुकामध्ये बदल घडविल्याची बाब चिनी शास्त्रज्ञ हे जियान्कुई यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये जाहीर केली होती. रेणुय कात्रीद्वारे हे बदल केल्याचे त्यांनी सांगितले होते. या कबुलीनंतर त्यांना संबंधित विद्यापीठाने पदावरून दूर केले होते. त्यांचे संशोधन थांबवून याप्रकरणी पोलीस तपासही सुरू करण्यात आला होता. चीनमधील या जनुकीय बदलाच्या प्रयोगामुळे जगभरात वादाला तोंड फुटले होते. सुरक्षिततेविषयी कोणत्याही चाचण्या न घेताच हा प्रयोग करणे अनैतिक असल्याचे जगभरातील शास्त्रज्ञांचे म्हणणे होते. हे प्रकरण तपासण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने डिसेंबरमध्ये तज्ज्ञांची समिती नेमली होती. या १८ सदस्यीय समितीच्या शिफारशींनुसार, जनुकीय आणि कायिक अशा सर्व प्रकारच्या प्रयोगांच्या नोंदणीची प्राथमिक योजना जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केली आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख अधनॉम घेब्रिसस म्हणाले की, तांत्रिक आणि नैतिक परिणाम स्पष्ट होत नाहीत तोवर कोणत्याही देशाने मानवी जनुकीय बदलांच्या प्रयोगांना परवानगी देऊ नये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 1:09 am

Web Title: genetic experiments world health organization mpg 94
Next Stories
1 केळ्याच्या तंतूंपासून सॅनिटरी नॅपकीन
2 vivo S1 कमी किंमतीत एक्स्ट्रा ऑर्डिनरी फिचर्स
3 तुम्ही पाहिलात का रिलायन्स जिओचा नवा सेट टॉप बॉक्स?
Just Now!
X