14 October 2019

News Flash

हृदयाची हानी भरून काढण्यासाठी जनुकीय उपचार

नवे संशोधन हे या क्षेत्राचा उत्साह वाढवणारे आहे.

हृदयविकाराच्या झटक्यामुळे झालेली हानी भरून काढण्यासाठी पेशींचे पुनरुज्जीवन करू शकेल, अशी जनुकीय उपचार पद्धती शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे.

हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीमध्ये अडथळा तयार झाल्याने मायोकार्डियल इन्फाक्र्शन अर्थात हृदयविकाराचा धक्का हे हृदयाची क्रिया बंद पडण्याचे प्रमुख कारण असते. या प्रकारच्या विकाराची जगभरात दोन कोटी तीस लाखांहून अधिक जणांना बाधा होते, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

याबाबत लंडनमधील किंग्ज महाविद्यालयातील संशोधकांनी सांगितले की, जेव्हा एखादी व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्यानंतर जिवंत राहते, त्या वेळी तिच्या हृदयावर व्रणाच्या स्वरूपात कायमस्वरूपी संरचनात्मक हानी पोहोचलेली असते. या हानीमुळे भविष्यात या व्यक्तीची हृदयक्रिया बंद पडण्याची जोखीम असते. नव्या संशोधनामुळे सध्याच्या हृदयरुग्णांमधील हा धोका टाळण्याचा मार्ग दिसू लागला आहे.

किंग्ज महाविद्यालयाचे मायुरो जियाक्का म्हणाले की, नवे संशोधन हे या क्षेत्राचा उत्साह वाढवणारे आहे. आतापर्यंत मूलपेशींच्या साहाय्याने हृदयाच्या पेशींचे पुनरुज्जीवन करण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण ते यशस्वी ठरले नाहीत. आता प्रथमच आम्ही मोठय़ा प्राण्यांमध्ये हृदयपेशींची वास्तविक दुरुस्ती झाल्याचे पाहत आहोत.

या विषयावरील अभ्यास हा ‘नेचर’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. या प्रयोगात संशोधकांनी हृदयविकाराचा झटका आलेल्या डुकराच्या हृदयात ‘मायक्रो आरएनए-१९९’ म्हणून ओळखले जाणारे जनुकीय द्रव्य अंतर्भूत केले. त्यानंतर महिनाभरानंतर या डुकराचे हृदय पुन्हा पूर्ववत कार्यक्षम झाल्याचे दिसून आले.

 

First Published on May 13, 2019 1:15 am

Web Title: genetic treatments for heart damage