गुगल म्हणजे अनेकांसाठी एखाद्या गाईडप्रमाणे काम करणारी यंत्रणा. अगदी काहीही अडले तरीही हक्काने मदत मागू शकतो अशी जागाच. आपल्या याच युजर्सशी गरज ओळखून गुगलही आपल्या फिचर्समध्ये सातत्याने नवनवीन बदल करत असते. गुगल मॅपमध्येही अशाचप्रकारे काही नवीन बदल करण्यात आले असून यामुळे प्रवास आणखी सोपा होणार आहे. आतापर्यंत आपण एखाद्या ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापर करत होतो. यामध्ये चालत, बाईकने, कारने आणि बसने जाण्याचे मार्ग आणि लागणारा वेळ दाखवला जातो. आता यामध्ये रिक्षाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे रिक्षाने तुमचे विशिष्ट ठिकाणापर्यंतचे भाडे किती होईल तेही समजू शकणार आहे. सुरुवातीला हे फिचर दिल्लीमध्येच असेल. त्यानंतर ते देशातील इतर शहरांतही सुरू करण्यात येईल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

याआधी खासगी प्रवासी वाहन बुक करण्यासाठी ओला, उबेर यांसारख्या अॅपचा वापर करावा लागत होता. मात्र या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी गुगलने आपली नवीन सुविधा सुरु केली आहे. यामध्ये ओला, उबेरप्रमाणे कार नसून ऑटोरिक्षाचा वापर करण्यात आला आहे. हे नवीन फिचर गुगल मॅपच्या सार्वजनिक वाहतूक आणि कॅब मोडमध्ये दाखवले जाणार आहे. या फिचरसाठी दिल्लीतील वाहतूक पोलीसांनी मोठ्या प्रमाणात मदत केली असून लवकरच इतर शहरातील ग्राहकांना याचा लाभ घेता येर्ईल असे गुगलकडून सांगण्यात आले आहे.

याबाबत माहिती देताना गुगल मॅपचे व्यवस्थापक विशाल दत्ता म्हणाले, प्रवाशांना रस्त्याची योग्य माहिती नसल्याने त्यांच्याकडून जास्त पैसे उकळले जातात. मात्र आता या फिचरच्या माध्यमातून प्रवाशांना चांगले नियोजन करता येणार आहे. गुगल मॅपच्या मदतीने प्रवाशांना आधीच भाडे आणि रस्त्याची माहिती मिळणार आहे. गुगल मॅपच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी अॅन्ड्राईड डिवाइसमध्ये गूगल मॅपला अपडेट करणे गरजेचे आहे.