सिंगापूरची GIC ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स रिटेलमधील १.२२ टक्क्यांची भागीदारी ५,५१२.५० कोटी रुपयांना विकत घेणार आहे. महिनाभरातील रिलायन्स समूहातील रिलायन्स रिटेलमध्ये ही सातवी महत्त्वाची आणि मोठी गुंतवणूक आहे. याआधी अबुधाबी येथील सॉवरेन फंड मुबादला इनवेस्टमेंट कंपनीने रिलायन्स रिटेलमध्ये ६,२४७.५ कोटी रुपयांची गुंतवणूकीची घोषणा केली होती. या गुंतवणूकीसह ते १.४ टक्केंची भागीदारी विकत घेत आहेत. आतापर्यंत रिलायन्स रिटेलमधील गुंतवणूक ३२ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपली ७.२८ टक्केची भागीदारी विकून ३२,१९७.५० कोटी रुपये जोडले आहेत. जागतिक स्तरावरील प्रमुख प्राइव्हेट इक्विटी फंड या क्षणाला रिलायन्स इंडस्ट्रीजवर विश्वास दाखवत आहे. त्यामुळेच रिलायन्सच्या इतर कंपन्यामध्येही गुंतवणूक करत आहेत. सध्या रिलायंस रिटेल व्हेंचरची व्हॅल्यूएशन ४.२८ लाख कोटी रुपये असून त्यावर इतर कंपन्या गुंतवणूक करत आहेत.

“रिलायन्स रिटेल परिवाराला GIC चं स्वगत करताना आनंद होत आहे. जगभरातील मोठमोठ्या कंपन्यामध्ये चार दशकांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक करणारी GIC रिलायन्स रिटेलसोबत भागीदारी करत आहे. याचा मला आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया GIC-Reliance Deal वर मुकेश अंबानी यांनी दिली आहे. ”

गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स रिटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करत आहेत. रिलायन्स रिटेलचे देशभरात १२ हजारांपेक्षा अधिक दुकानं असून वर्षाला 64 कोटी लोकं खरेदीसाठी येत असतात. रिलायन्स रिटेल देशभरात सर्वात मोठा आणि विकसित होणारा रिटेल व्यवसाय चालवते. सिल्वर लेक पार्टन्स, केकेआर, जनरल अटलांटिक, सिल्वर लेक को इनव्हेस्टर, मुबादला आणि टीपीजीनंतर GICने केलेली ही रिलायन्स रिटेलमधील सातवी मोठी गुंतवणूक आहे.