५० देशांतील ५००० प्रतिनिधींचा सहभाग
आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली देणगी. सर्वाधिक प्राचीन उपचार पद्धतीतील असलेल्या आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दर दोन वर्षांनी केरळमध्ये ‘जागतिक आयुर्वेद महोत्सवा’चे आयोजन करण्यात येते. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात केरळमधील कोझिकोडे येथे आयुर्वेद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील ५० देशांमधील ५००० प्रतिनिधी या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत.
२९ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान हा महोत्सव होणार आहे. आयुर्वेदासंदर्भात विविध विषयांवर या महोत्सवात चर्चा करण्यात येणार आहे. जगभरातील आरोग्यतज्ज्ञ, डॉक्टर, आयुर्वेदाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी, विविध रुग्णालये व संस्थांचे प्रतिनिधी, विविध देशांचे सरकारी प्रतिनिधी आदी या महोत्सवात सहभागी होणार आहेत.
दर दोन वर्षांनी केरळमध्ये जागतिक आयुर्वेद महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा या महोत्सवाचे आयोजन ‘सेंटर फॉर इनोव्हेशन इन सायन्स अँड सोशल अॅक्शन’ या संस्थेने केले आहे. या संस्थेला केरळ सरकार आणि केंद्र सरकारचा आयुष विभाग साहाय्य करणार आहे. केरळ सरकारचा आयुष विभाग, पर्यटन विभाग आणि उद्योग विभागही हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
केरळमध्ये २०१२पासून जागतिक आयुर्वेद महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. २०१२मध्ये तिरुवनंतपुरम येथे, तर २०१४मध्ये कोची येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या महोत्सवात ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावर परिसंवाद होणार आहेत, त्याशिवाय अमेरिका, जर्मनी, इटली, इंग्लंड, मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर, ब्राझिल, अर्जेटिना आणि रशिया या देशांमधील आयुर्वेदावर काम करणाऱ्या संस्था सहभागी होणार आहेत. केरळमधील हा महत्त्वाचा महोत्सव मानला जातो आणि आयुर्वेदाचे विचार व महत्त्व जाणण्यासाठी जगभरातून या महोत्सवाला लोक येतात.