वादग्रस्त तणनाशक ग्लायफॉसेटमुळे कर्करोग होण्याची शक्यता असते हा समज चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचा दावा अमेरिकेच्या पर्यावरण रक्षण विभागाने (ईपीए) केला आहे. त्यामुळे ग्लायफॉसेटबाबत कर्करोगाच्या जोखमीचा इशारा देणारी सूचनापत्रके वापरण्याची तरतूद यापुढे पाळण्याची सक्ती या विभागाकडून केली जाणार नाही.

अमेरिकेच्या पर्यावरण विभागाने गुरुवारी घेतलेल्या या निर्णयाचा फायदा तेथील बडा कृषी उद्योग असलेल्या मोन्सान्टो आणि त्यांची मूळ जर्मन कंपनी बायर यांना होणार आहे. या कंपन्यांचे प्रमुख उत्पादन असलेल्या ‘राऊंड अप’ या तणनाशकाविरोधात अनेक कायदेशीर दावे दाखल झालेले आहेत.

ग्लायफॉसेटमुळे कर्करोग होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोगावरील आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेने २०१५ मध्ये व्यक्त केले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या संस्थेनेच अशी जोखीम व्यक्त केल्याने तसा धोक्याचा इशारा देणारी सूचना या तणनाशकावर तसेच संबंधित कीडनाशकांच्या वेष्टणांवर छापण्याची सक्ती २०१७ पासून कॅलिफोर्नियात करण्यात आली होती; पण याबाबत २०१७ पासून आपण अधिक व्यापक माहिती घेतल्याचा दावा ‘ईपीए’ने उद्योजकांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

याबाबत ‘ईपीए’चे प्रशासकीय अधिकारी अ‍ॅन्ड्रय़ू व्हीलर यांनी निवेदन जारी केले आहे. त्यात ते म्हणतात की, ‘या उत्पादनांमुळे कर्करोग होण्याची जोखीम नसल्याचे पर्यावरण रक्षण विभागाला माहीत झाले आहे. त्यामुळे ही उत्पादने कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात असा चुकीचा दावा करणारी पत्रके त्यांच्यासोबत देणे हे बेजबाबदारपणाचे आहे. कॅलिफोर्नियातील अशा चुकीच्या धोरणाची सक्ती आम्ही देशभरात होऊ देणार नाही.’