येथील सरकारी आयुर्वेद रूग्णालयात थॅलेसिमिया रूग्णांवर बक ऱ्याच्या रक्ताने उपचार करण्यात येणार असून या प्रकल्पाला पंजाब सरकार व केंद्राने मंजुरी दिली आहे. एकूण ३५ लाख रूपये खर्चाचा हा प्रकल्प असून तो केंद्रीय आरोग्य मंत्रालय राबवित आहे, असे सरकारी आयुर्वेद रूग्णालयाचे अधिकारी हेमंत कुमार यांनी सांगितले. पंजाब सरकारने या प्रकल्पासाठी तेरा लाख रूपये दिले आहेत. चार ते पाच महिन्यात हे उपचारकेंद्र सुरू केले जाणार आहेत.

मलाशयाच्या मार्गाने  रूग्णांना बकऱ्याचे रक्त टोचण्यात येणार असून त्यामुळे रूग्णाचे हिमोग्लोबिन कमी होणार नाही.  कालांतराने रक्त देण्याची गरजही रूग्णाला भासणार नाही. तीनदा, दोनदा असे रक्त देण्याचे प्रमाण कमी केले जाईल. सीएमसी रूग्णालयाचे डॉ. ए.जी थॉमस यांनी सांगितले की, या उपचार पद्धतीचे काहीही पुरावे नसून ज्यांनी ही उपचार पद्धती शोधली असेल त्यांनी आंतरराष्ट्रीय वैद्यक नियतकालिकात आधी त्याची माहिती प्रकाशित  करावी. कुमार व शेवली अरोरा या आयुर्वेद डॉक्टरांनी मात्र ही नवीन पद्धत असून अहमदाबाद रूग्णालयातून शिकून आल्याचे सांगितले. अहमदाबादच्या अखंडानंद आयुर्वेदिक रूग्णालयात सध्या या पद्धतीने उपचार सुरू आहेत.

गुजरातमधील अतुल बाकर याच्यावर या पद्धतीने उपचार करण्यात आले आहेत. यासाठी उपकरणे खरेदी करण्यात आली असून पाच हजार वर्षे जुनी अशी ही  उपचार पद्धत आहे. बाकर नावाच्या रूग्णावर उपचार यशस्वी  झाले आहेत, असे आयुर्वेदिक डॉक्टर वात्सायन यांनी सांगितले.