News Flash

‘अशी’ साजरी करा कृष्णाष्टमी

भारतभर मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण

‘अशी’ साजरी करा कृष्णाष्टमी

कृष्ण हा देव अगदी बाल रुपापासून सर्व रुपांमध्ये आपल्यासमोर येतो. त्यामुळे सर्व वयोगटातील आणि भारतातील जवळपास सर्व भागात कृष्णजन्माच्या पूजेला मोठे महत्त्व आहे. कृष्णाबाबतच्या कथाही आपल्याकडे भरपूर आहेत. भगवान विष्णूने धर्माचे रक्षण करण्याकरिता ज्या दिवशी श्रीकृष्ण रूपात अवतार घेतला, तो दिवस म्हणजेच ‘गोकुळाष्टमी’ असे मानले जाते. गोकुळाष्टमी-कृष्णाष्टमीचा हा उत्सव मोठ्या थाटामाटाने सर्वत्र साजरा केला जातो. मंदिरातून फुलांची आरास केली जाते. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा केला जातो. यामध्ये महिला भजन, पूजन, कीर्तन इ. कार्यक्रम सादर करतात.

ज्यांच्या घरी गोकुळाष्टमी व्रत असते, त्यांनी त्या दिवशी उपवास करावा. गोकुळाष्टमीचा उपवास हा त्या दिवशी सोडला जात नाही तर तो दुसर्‍या दिवशी सोडतात. त्यालाच कृष्णाष्टमीचे पारणे असे म्हणतात. दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन हे पारणे फेडतात म्हणजेच उपवास सोडतात. आता दहीकाला म्हणजे काय तर विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे ‘काला’ होय. श्रीकृष्णाने व्रजमंडळात गायी चारतांना स्वतःची आणि सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला अन् सर्वांसह ग्रहण केला. यावरुनच पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.

या दिवशी कोकणात बालगोपाल मंडळी नाचत नाचत, वाद्ये वाजवीत तोंडाने ‘‘गोविंदा आलाऽरेऽऽ आला’’ किंवा नुसते ‘‘गोविंदा ऽऽगोपाळा’’ अशी गाणी म्हणत गावभर फिरून शेवटी श्रीनारायणाच्या देवालयात जाऊन दर्शन घेऊन मग आपापल्या घरी जातात. श्रावण वद्य नवमीला ‘दहीकाला’ असे म्हणायची प्रथा आहे. आपल्याकडे हा दिवस दहीहंडी म्हणून ओळखला जातो. या दिवशी नाचणाऱ्या बाळगोपाळांच्या अंगावर ताक, दही, कढत पाणी व थंड पाणी ओतण्याची पद्धत आहे. हल्ली प्रत्येक गावात अगदी चौकाचौकात दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यामध्ये मोठमोठ्या कलाकारांना बोलावून कार्यक्रम करणे, हंडी फोडणाऱ्या गटांकडून आपल्या मंडळाची हंडी फोडून घेणे असे प्रकार असतात.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2017 12:05 pm

Web Title: gokulashtami 2017 celebration mumbai maharashtra how to celebrate
Next Stories
1 ‘या’ वेळेला केलेली कृष्णाची पूजा ठरु शकते लाभदायक
2 कमी वेतनावर काम करणाऱ्यांना आरोग्याच्या समस्या
3 कृत्रिम गोड पदार्थामुळे मधुमेह
Just Now!
X