दिवाळीच्या काळात सोन्याची मागणी खूप वाढते. कारण देशभरातील लोक या पितधातूची खरेदी शुभ मानतात. परंतु, गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) आणि सॉवरिन गोल्ड बाँड्स (एसजीबीज्‌) सारख्या भौतिक सोन्याला असलेल्या पर्यायांची लोक्रप्रियता त्यांच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे वाढलेली आहे. जर तुम्ही या दिवाळीत सोन्यामध्ये गुंतवणूक करू पाहात असाल, तर तुम्ही रोखता, सुरक्षितता, करकार्यक्षमता आणि गुंतवणुकीची सोय या बाबी लक्षात घेऊन त्याचे लाभ समजून घ्यायला हवेत. चला आपण या उत्सवी मोसमामध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक कशी करावी ते पाहू.

रोखतेचा पैलू

भौतिक सोन्यामध्ये गुंतवणूक करणे म्हणजे उच्च रोखता. ही अशी गुंतवणूक आहे जिच्यातून तुम्ही चालू सोने खरेदी दरावर कधीही बाहेर पडू शकता. परंतु, सोने खरेदी आणि विक्री यांमध्ये लक्षणीय फरक असतो याची नोंद घ्यायला हवी. समजा विक्री किंमत (धातू व्यापारी ज्या किंमतीला सोने विकतो ती) १० ग्रॅमसाठी ३० हजार रुपये असेल तर खरेदी दर (धातू व्यापारी ज्या किंमतीला सोने खरेदी करतो तो) २८ हजार रु २८ हजार/१० ग्रॅम एवढा कमी असू शकतो. म्हणूनच, तुम्ही जर थोड्याच अवधीत सोन्याची खरेदी आणि विक्री केलीत, तर तुम्हाला सोने खरेदी आणि विक्री दरातील फरकामुळे खूप तोटा सहन करावा लागेल.

सोन्याच्या ईटीएफची रोखता खूप जास्त असते आणि शेअर बाजारावर त्याचा व्यवहारही होतो. तुम्ही वास्तव काळातील दरात व्यवहार सत्रादरम्यान ते विकू शकता आणि विक्रीचा खर्चसुद्धा भौतिक सोन्याच्या तुलनेत खूप कमी असतो. तुम्ही ईटीएफ विकता तेव्हा तुम्हाला केवळ ब्रोकरेज द्यावे लागते (यामध्ये शासकीय शुल्क समाविष्ट). शेअर बाजाराच्या मंचावर सोन्याच्या ईटीएफच्या खरेदीविक्रीत खूप कमी फरक असतो.

तुम्ही अधिकृत बँकांकडून आणि एनबीएफसीज्‌कडून तसेच शेअर बाजार व्यवहार मंचावरून एसजीबी खरेदी करू शकता. एसजीबीच्या खरेदी किंवा विक्रीचा खर्च भौतिक सोन्याच्या तुलनेत खूप छोटा असतो. एसजीबी ईटीएफसारखेच खरेदी किंवा विक्री केले जाऊ शकतात, परंतु कर वेगळ्या पद्धतीने लागू होतील.

सुरक्षितता घटक

सोन्यामधील गुंतवणूकीची चोरी होण्याची जास्त शक्यता असते, पण हेच पैसे जर तुम्ही ईटीएफमध्ये किंवा एसजीबीमध्ये गुंतवणूक केलीत तर तुम्ही गुंतवणूक सुरक्षित ठेवू शकता. सोन्याची काळजीपूर्वक हाताळणी करावी लागते आणि घरी ठेवणे असुरक्षित असते. ईटीएफ आणि एसजीबी डीमटिरिअलाइज्ड स्वरूपात ठेवलेले असतात आणि डीमॅट खात्यामध्ये राहतात, म्हणूनच ते सुरक्षित आणि हाताळण्यास सोपे असतात.

कर कार्यक्षमता

जर तुमच्याकडे ३ किंवा त्याहून अधिक काळ भौतिक स्वरूपात सोने, ईटीएफ किंवा एसजीबी असेल, तर त्यास दीर्घकाळ धारणा मानले जाते आणि निर्देशांकनाने २० टक्के दराने दीर्घकालीन भांडवल लाभासाठी (एलटीसीजी) ते पात्र होते. ३ वर्षांपूर्वी विकण्यास लघुकालीन भांडवल लाभ (एसटीसीजी) मानले जाते आणि या लाभावर व्यक्तिच्या लागू उत्पन्न स्तराच्या दरानुसार कर आकारला जातो. परंतु, कर आघाडीवर एसजीबी आणखी एक लाभ देऊ करतो. जर तुम्ही मुदतपूर्तीपर्यंत तो धारण केलात आणि मुदतपूर्तीनंतर तो विमोचित केलात, तर संपूर्ण लाभ हा करमुक्त असतो.

मिळकत लाभ

ईटीएफ आणि एसजीबीचे दर सोन्याच्या दराशी जोडलेले असतात. म्हणूनच, तिन्ही गुंतवणूक उत्पादनांचे भांडवल दरवाढ लाभ सारखेच असतात, पण भांडवल लाभाच्या फायद्यासोबतच, एसजीबी त्याच्या गुंतवलेल्या मूल्यावर गुंतवणूकदारांना द.सा.द.शे. २.५ टक्के दराने व्याज सुद्धा देऊ करते. म्हणूनच, जर तुम्ही अतिदीर्घकाळासाठी गुंतवणूक करत असाल, तर द.सा. २.५ टक्के व्याजाने एकूण मिळकतीत खूप फरक पडू शकतो.

कर्ज सुविधा

सोन्यासमोर घेतलेले कर्ज हे अतिशय लोकप्रिय ऋण उत्पादन आहे. तुम्ही बँकेकडे सोने गहाण ठेवून त्याबदल्यात कर्ज घेऊ शकता. तसेच, कर्जाची सुविधा एसजीबी बदल्यातही दिली जाते, परंतु, अशी कर्जाची सुविधा ईटीएफ बदल्यात मिळत नाही.

गुंतवणूक लवचिकता

गुंतवणुकीच्या वेळी, एसजीबी किंवा ईटीएफ खरेदी करताना तुम्ही १ ग्रॅम सोन्याएवढे कमी सोने खरेदी करू शकता. पण १ ग्रॅम सोने खरेदी करणे आणि ते जपणे तुम्हाला कठीण जाऊ शकते. छोट्या प्रमाणात खरेदी करण्याच्या सुविधेमुळे, जसजसे तुम्ही तुमच्या खात्यात सोने साठवत जाता, आणि निवेशसंच वाढवत जाता तसा तुमचा गुंतवणुकीचा लाभ गुणांकाने वाढू शकतो व तुम्हाला रुपया परिव्यय सरासरीचा (रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग) लाभही मिळतो.

म्हणूनच, जर तुम्ही दीर्घकाळाच्या गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करू पाहात असाल, तुम्हाला त्यावर घसघशीत मिळकत हवी असेल आणि अशा गुंतवणुकीवर मिळणाऱ्या उत्पन्नावर करलाभ मिळवायचा असेल, तर भौतिक सोन्याच्या गुंतवणुकीपलिकडे पाहून तुमचे पैसे नव्या युगाच्या सोन्याच्या उत्पादनांमध्ये आणि एसजीबी व सोन्याच्या ईटीएफमध्ये गुंतवण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.

आदिल शेट्टी, सीईओ, बँकबाझार