X
X

खुशखबर..! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचा भाव

गणपती बाप्पाच्या आगमनानंतर प्रति तोळा ४० हजार रूपयांच्या जवळ गेलेल्या सोन्यांच्या दरात घट होताना दिसत आहे

मागील काही दिवसांत सोन्या आणि चांदीच्या दरात झालेली वाढ आता काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर प्रति तोळा ४० हजार रूपयांच्या जवळ गेलेल्या सोन्यांच्या दरात घट होताना दिसत आहे. चांदीच्याही दरांत मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे.

सोन्याची किंमत बुधवारी ०.२६ टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या आठवड्यात सोनं ३९२७८ रूपयांवर गेलं होतं. बुधवारी प्रति दहा ग्रॅमला १७३० रुपयांनी सोनं स्वस्त झालं आहे. या घसरणीमुळे सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅमला ३८, १५४ रूपये झाली आहे. रुपयाला मिळालेलं बळ आणि मागणी कमी झाल्यानं सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे म्हटले जात आहे.

सोन्याप्रमाणे चांदीचे दरही कमालीचे घसरलेत. चांदीच्या किमतीत ०.२३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. चांदीच्या दरांत प्रतिकिलो ३८०० रूपयांनी घट झाली आहे. बुधवारी चांदीची किंमत प्रतिकिलो ४७, ६८६ रूपये आहे. गेल्या आठवड्यात चांदीची किंमत प्रतिकिलो ५१,४८९ रूपये होती.

आंतराराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं १५५० डॉलर प्रति औंस होतं. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं १४९१ डॉलर प्रति औंस झाले आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात तब्बल २४ टक्क्यांनी तर चांदीच्या दरात २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीमागील एक कारण म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेलं व्यापार युद्ध असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचं सावटही एक कारण असू शकते.

सध्या जगभरात मंदीचे वातावरण आहे. जागतिक मंदीवर मात देण्यासाठी व उत्पादनाला तसेच आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी युरोप व अमेरिकेच्या मध्यवर्ती बँका व्याजदरांमध्ये कपात करतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जर व्याजदरांमध्ये कपात झाली तर सोन्याचे भाव चढेच राहतील कारण सुरक्षिततेसाठी गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करतील असा तज्ज्ञांचा होरा आहे. परंतु सध्यातरी सोन्याच्या भावात लक्षणीय घसरण झाल्यामुळे सोन्याच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढेल अशी आशा या क्षेत्रातले उद्योजक करत आहेत.

23
First Published on: September 11, 2019 4:22 pm
Just Now!
X