News Flash

गुडघे बळकट करण्यासाठी ‘हे’ आसन करा

इतरही अनेक फायदे

बैठक स्थितीतील या आसनामुळे गुडघे बळकट होण्यास मदत होते. गोमुखासन असे या आसनाचे नाव आहे. सुरुवातीला जमिनीवर सुखासनात प्रथम बसावे. नंतर डाव्या मांडीवर उजवी मांडी ठेवण्याचा प्रयत्न करावा. अशा पद्धतीने गायीच्या तोंडाच्या आकाराच्या दुमडलेल्या मांडय़ा एकावर एक ठेवण्याचा प्रयत्न करावा. नंतर डावा हात खालून वर व उजवा हात वरून खाली एकमेकात गुंफून पकडण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीत श्वसन संथ ठेवावे, जास्तीत जास्त वेळ या स्थितीत राहू असा प्रय़त्न करावा. हे आसन दोन्ही बाजूने करावे. त्यावेळी उजवा हात खालून वर व डावा हात वरून खाली पाठीवर दोन्ही हात पकडण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी केलेले गोमुखासन आपल्या हातापायांना चांगलाच व्यायाम देते.

हे आसन नियमित केल्याने गुडघ्याचे सर्व आजार दूर होऊ शकतात. या आसनाने अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होते. तसेच गुडघे, पोटऱ्या मांडय़ा, हातापायांचे स्नायू, दंड यामधील कार्य सुधारायला मदत होते. पहिल्यांदा दोन्ही हात पकडता येत नाही. पण सरावाने ते जमते. या आसनामुळे लैंगिक सुखाचा आनंद द्विगुणित होतो. स्त्रियांचे गर्भाशयाचे विकार बरे होण्यास या आसनाची मदत होते. कंबरेवर वाढलेली चरबी कमी व्हायला मदत होते. स्त्रियांचा बांधा कमनीय राहण्यासाठी या आसनाचा चांगला उपयोग होतो. स्थूल लोकांना आपल्या जाडीमुळे हे आसन करायला त्रास होतो. पण तरीही त्यांनी जमेल तेवढे व जमेल तसे गोमुखासन नियमित करावे. पाय गुडघ्यात दुमडून नितंबाला असा काही लावावा की ज्याने नाभीचे कार्य योग्यप्रकारे चालू रहाते व नाडी शुद्ध होते. आपल्या गुडघ्यांचा आकार पाय दुमडून गुडघे एकमेकांवर ठेवल्यामुळे अगदी गायीच्या तोंडासारखा होतो. वीर्यविकारांना दूर करणारे गोमुखासन हातापायांच्या स्नायूंबरोबरच शरीराची स्नायूसंस्था मजबूत बनवते. मन एकाग्र करायचे असेल तरीही गोमुखासनाचा फायदा होतो.

या आसनात जास्तीत जास्त मनामध्ये सावकाश वीस अंक मोजून स्थिर रहाण्याचा प्रयत्न करावा. हळूहळू नियमित सरावाने स्थिरता वाढू लागते. मुळव्याध व मधुमेह असणाऱ्यांनी हे आसन रोज करावे. ज्यांची पोटाची किंवा पाठीची शस्त्रक्रिया झाली आहे किंवा कृत्रिम हाडरोपण प्रक्रिया झाली आहे अशांनी गोमुखासन करू नये. नेहमी तज्ञ योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करावे. जेवढी स्थिरता वाढेल तेवढे या आसनाचे फायदे अधिक मिळतील. काही वेळा प्रवास करून करून शिणलेल्या हातापायांना एक प्रकारची शक्ती व स्फूर्ती प्रदान करण्यासाठी प्रवासाहून परतल्यावर गोमुखासन करावे.

सुजाता गानू-टिकेकर,

योगतज्ज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 6:27 pm

Web Title: gomukhasan yoga useful for knee and many more health problems
Next Stories
1 कडीपत्त्याचे ‘हे’ उपयोग जाणून घ्या
2 सफाईकाम केल्याने महिलांच्या श्वसनक्षमतेवर परिणाम
3 दही हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त
Just Now!
X