इंजिनिअरींग केले की गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळते त्यामुळे मध्यंतरी तरुणांनी मोठ्या प्रमाणात या क्षेत्राकडे धाव घेतली. मधल्या काळात इंजिनिअरची संख्या जास्त झाल्याने आणि नोकरीच्या संधी कमी झाल्याने इंजिनिअर्सनी घरी बसण्याची किंवा कमी पगारावर काम करण्याची वेळ आली होती. मात्र आता या सर्वांसाठी एक खुशखबर आहे. इंजिनिअर्सना देशभरात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार असल्याचे समजले आहे. बड्या कंपन्यांमध्ये जवळपास ३० हजार जागांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी तरुणांना प्रवेश परीक्षा आणि मुलाखतींना सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये विविध शाखांतील इंजिनिअरला संधी मिळणार आहेत.

डिलिव्हरी सर्विस, ग्राहक सेवा केंद्र, आणि कंपनी इंजिनिअर्सच्या माध्यमातून या नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एचसीएल या बड्या आयटी कंपनीकडून आगामी काळात २५ ते ३० हजार नोकऱ्या देण्यात येणार आहेत. टीसीएसकडूनही आणखी ४० टक्के नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. देशातील विविध ठिकाणी या नोकऱ्या उपलब्ध असल्याने बेरोजगार असलेल्या तरुणांसाठी आणि कमी पगारावर काम करणाऱ्यांसाठी ही निश्चितच चांगली संधी ठरेल. यामध्ये अनुभवी आणि फ्रेशर अशा दोघांनीही संधी असेल असे सांगण्यात येत आहे. बऱ्याच काळानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात भरती होणार असल्याने तरुणांसाठी ही निश्चितच अतिशय आनंदाची बाब आहे.