तुम्ही फेसबुकचे नियमित वापरकर्ते असाल आणि मोबाईलच्या तीव्र प्रकाशामुळे फेसबुकवर सर्फिंग करताना तुम्हाला त्रास होत असेल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. फेसबुक आता आपल्या अॅपवर देखील ‘डार्क मोड’ आणण्याच्या तयारीत आहे. लवकरच ही सुविधा फेसबुकच्या मोबाईल अॅपमध्ये उपलब्ध होणार आहे. फेसबुकच्या वेब व्हर्जनवर याआधीच डार्क मोडची सुविधा उपलब्ध आहे. फेसबुक इतरही काही नव्या फिचर्सवर काम करीत आहे, ज्याची कंपनी लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. 9to5 Google या वेबसाइटच्या हवाल्याने फायनान्शिअल एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.

या वृत्तानुसार, फेसबुकच्या अॅपवर ‘डार्क मोड’ ऑन आणि ऑफ करण्याच्या पर्यायाशिवाय ‘यूझ सिस्टिम सेटिंग्ज’ असा एक अन्य पर्यायही असेल. यामध्ये जर युजरचा फोन डार्क मोडवर असेल तर फेसबुक अॅप आपोआप डार्क होऊन जाईल.

वेब व्हर्जनवर कसं सुरु करणार ‘डार्क मोड’?

मार्च महिन्यांत फेसबुकच्या डेस्कटॉप व्हर्जनमध्ये नवा लूक अॅड करण्यात आला आहे. तसेच ‘डार्क मोड’ फीचरही देण्यात आलं आहे. जर युजरने पहिल्यापासूनच फेसबुकच्या नव्या लूकची निवड केली असेल तर यामध्ये केवळ ड्रॉप डाउन अॅरोवर क्लिक करावं लागेल त्यानंतर डार्क मोड फीचर दिसेल. तसेच जर आपण आद्यापही फेसबुकचा क्लासिक लूकचा वापर करीत असाल तर डार्क मोड इनेबल करण्यासाठी फेसबुकच्या वेब व्हर्जनमध्ये लॉग इन करुन त्यानंतर क्वीक हेल्प या आयकॉननंतर असलेल्या ड्रॉप डाउन अॅरोवर क्लिक करावं लागेल. यानंतर स्वीच टू फेसबुक वर क्लीक केल्यानंतर आपलं फेसबूक पेज पूर्णपणे बदलून जाईल.

या नव्या लूकमध्ये त्याच ड्रॉप डाऊनमध्ये डार्क मोड इनेबल आणि डिसेबल केलं जाऊ शकतं. जर युजरला नव्यावरुन जुन्या क्लासिक लूकवाल्या फेसबुक पेजवर पुन्हा यायचं असेल तर ड्रॉप डाउन मेनूमध्ये स्वीच टू क्लासिक फेसबुक वर क्लीक करावं लागेल. यानंतर आपला जुना फेसबुक लूक आपल्याला परत मिळेल.