अनेकदा आपलं फोनकडे लक्ष नसतं, गरज लागते तेव्हा लक्षात येतं की फोन घरीच विसरलोय. किंवा अनेकदा आपण फोन बरोबर घेवून जातो आणि विसरुन येतो. तुमची हिच अडचण लक्षात घेवून एक खास स्मार्ट जॅकेट तयार करण्यात आलं आहे. स्मार्टफोन विसरल्यास हे जॅकेट त्याबाबत आठवण करुन देणार आहे.

Google आणि Levi’s कंपन्यांनी एकत्र येत हे स्मार्ट जॅकेट तयार केलं असून ‘Always Together’ मोडवर हे डिझाइन करण्यात आलं आहे. अल्वेज टुगेदर एक इलेक्ट्रिक अलर्ट आहे, यामध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणे जॅकेट आणि फोनमधील अंतर सेट करु शकतात. म्हणजेच जर तुम्ही घातलेल्या जॅकेट आणि फोनमधील अंतर जास्त झालं तर तुम्हाला अलर्ट मिळेल.

हे अलर्ट दोन्ही प्रकारे काम करतं. यामध्ये फोनवर एक नोटिफीकेशन येतं तसंच जॅकेटमधील टॅग देखील चमकायला आणि व्हायब्रेट व्हायला सुरूवात होते. याचा वापर करण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये Jacquard app असणं आवश्यक आहे. 350 डॉलर म्हणजे जवळपास 25 हजार रुपये इतकी या जॅकेटची किंमत असणार आहे.