कार्यालयांमध्ये एखाद्या कर्मचाऱ्यासोबत लैंगिक अत्याचाराचे प्रकार सातत्याने समोर येत असतात. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात गुगल कंपनीतही लैंगिक अत्याचारांमुळे जवळपास २० हजार कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला होता. त्यावरुन गुगलवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर याची गंभीर दखल घेवून यावर उपाय शोधण्यास सुरूवात केल्याचं गुगलने जाहीर केलं होतं, त्यानुसार आता गुगलने आपल्या कर्मचाऱ्यांना लैंगिक शोषणाचा प्रयत्न झाल्यास त्याची तक्रार वेळीच व जलद करता यावी यासाठी एक वेबसाइटच तयार केली आहे.

‘डायवर्सिटी, इक्विटी अॅन्ड इनक्लुजन’च्या जागतिक संचालक मिलोनी पार्कर यांनी या विषयीची माहिती आपल्या ब्लॉगवरून दिली आहे. ‘गुगलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रतिष्ठा आणि सन्मान मिळालाच पाहिजे, त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्यांना तक्रार करणे सोयीचे जावे यासाठी अनेक तांत्रिक बाबींचा अभ्यास करून व त्यांचा मेळ घालून आम्ही सोपी वेबसाइट तयार केली आहे’, असं पार्कर यांनी म्हटलं आहे.

‘या वेबसाइटमुळे अशाप्रकारच्या प्रकरणांतील पीडितांना ही प्रकरणं सरळ न्यायालयात घेऊन जाता येतील, तसेच लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांतील मध्यस्थांचा हस्तक्षेपही पूर्णपणे बंद होईल, असा विश्वास गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी व्यक्त केला आहे.