गुगलने आपल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅपसंदर्भात मोठी घोषणा करताना या अॅपची मोफत सेवा लवकरच बंद होणार असल्याचे म्हटले आहे. ‘गुगल मीट’च्या मोफत व्हर्जनमध्ये ३० सप्टेंबरनंतर मोठा बदल होणार आहे. ३० सप्टेंबरनंतर गुगल मीट केवळ ६० मिनिटांची मोफत सेवा देईल. मात्र या कालावधीनंतरही बोलायचे असल्यास शुल्क मोजावे लागणार आहे. ३० सप्टेंबरपासून गुगलच्या सेवांचे नियम बदलणार आहे.

नवीन नियम गुगलच्या जी सूट आणि जी एज्युकेशनच्या सेवांनाही लागू होणार आहेत.  जी सूटसाठीही यापुढे पैसे मोजावे लागणार आहेत. नवीन अपडेटनुसार आता जी सूटसाठी महिन्याला २५ डॉलर म्हणजेच १८०० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. आधी ही सेवा मोफत होती. ज्याअंतर्गत एकाच वेळी अडीचशे जण सहभागी होऊ शकत होते. तर एकाच वेळी एक लाख जण हे टेलिकास्ट लाइव्ह पाहू शक होते. ही मीटिंग रेकॉर्ड करुन यासंदर्भातील माहिती गुगल ड्राइव्हवरही सेव्ह करण्याची सुविधा मोफत उपलब्ध होती.

 

कोरोना महामारी मुळे सगळ्या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या मिटिंगसाठी व्हिडीओ कॉलिंगचा वापर वाढल्याचे चित्र दित आहे. व्हिडीओ कॉलिंगसाठी झूम अॅपचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. याच पार्श्वभूमीवर गुगलनेसुद्धा गुगल मीट नावाचे व्हिडोओ अॅप बाजारात आणले.

अगोदर गुगल मीट चा वापर फक्त जीसूट यूजर्स करत होते. पण नंतर ही सेवा सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली. अॅप ट्रैफिक ट्रॅक करणाऱ्या साईट दिलेल्या माहितीनुसार, १७ मे २०२० पर्यंत गुगल मीट चे डाउनलोड करणाऱ्यांची संख्या ही पाच कोटींपर्यंत होती. सात जुलैपर्यंत गुगल मीट युझर्सचा आकडा दहा कोटींच्याही पुढे गेला.