‘गुगल’ने आपल्या युजर्ससाठी ‘गुड न्यूज’ दिली आहे. यापूर्वी गुगलने आपल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप Google Meet ची फ्री सर्व्हिस 30 सप्टेंबरला अर्थात आजपासून संपेल, असं जाहीर केलं होतं. पण, आता कंपनीने ही फ्री सर्व्हिस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलने एका ब्लॉग पोस्टद्वारे याबाबत माहिती देताना, युजर्स Google Meet ची फ्री सर्व्हिस आता पुढील वर्षी मार्च २०२१ पर्यंत वापरु शकतात असे स्पष्ट केले आहे.

करोना व्हायरसच्या संकटामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या युजर्सच्या सोयीसाठी गुगलने या वर्षी एप्रिल महिन्यात Google Meet ची सेवा सर्वांसाठी मोफत करण्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर ही सेवा केवळ 30 सप्टेंबरपर्यंत फ्री असेल आणि युजर्सना केवळ 60 मिनिटे फ्री कॉलिंग मिळेल व 60 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वापरासाठी शुल्क आकारलं जाईल, असं सांगण्यात आलं होतं. पण आता कंपनीने ही फ्री सर्व्हिस मार्च २०२१ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

“यंदा कुटुंबियांसोबतची भेट असो की लग्न समारंभ सर्व गोष्टी व्हिडिओ कॉलवर पार पडत आहेत. अशात गुगल मीटवर अवलंबून असलेल्यांची मदत करण्यासाठी म्हणून Google Meet ची फ्री सेवा 31 मार्च, 2021 पर्यंत वाढवत आहोत”, असं गुगलने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे. कोविड-19 महामारीमुळे वर्क फ्रॉम होम, मिटिंग, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लासेस यांचा विचार करुन गुगलने 30 सप्टेंबरपर्यंत गुगल मीटची सेवा मोफत केली होती. ही मोफत सेवा आता अजून वाढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे युजर्स आधीप्रमाणे ही व्हिडिओ कॉलिंग सेवा मोफत वापरु शकणार आहेत.