जागतिक स्तरावरील अव्वल टेक कंपन्यांपैकी एक असणाऱ्या गुगलची लोकप्रिय मेसेजिंग सेवा गुगल हँगआऊट आता कोणत्याही क्षणी बंद होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून यासंदर्भातील बातम्या अनेक वेबसाईटने केल्या आहेत. मात्र गुगलने यासंदर्भात कोणतीही औपचारिक माहिती दिलेली नाही. त्यामुळे गुगलची ही लोकप्रिय सेवा बंद होणार की काय याबद्दल नेटकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तरी अशाप्रकारचा कोणताही निर्णय गुगलने घेतला नसल्याची माहिती गुगल हँगआऊटचे प्रमुख स्कॉट जॉन्सन यांनी ट्विट करुन सांगितले आहे. म्हणूनच सध्या गुगल हँगआऊट बंद होण्याच्या बातम्या अफवाच आहेत असचं म्हणता येईल.

हँगआऊट बंदच्या बातम्या येऊ लागल्यानंतर स्कॉटने याचसंदर्भात काही ट्विट केले आहेत. यामध्ये त्याने संबंधित बातमी अयोग्य पद्धतीने सादर केल्याचे म्हटले आहे. आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतो, ‘हँगआऊट बंद करण्यासंदर्भात कोणताही निर्णय आम्ही अद्याप घेतलेले नाही. आणि तसे असल्यास संपूर्णपणे ही सेवा बंद केली जाणार नाही. सध्या गुगुल हँगआऊट वापरत असणाऱ्या युझर्सला गुगल चॅट आणि गुगल मिटींग्ससारख्या प्लॅटफॉर्मवर शिफ्ट केल्यानंतर हळहळू सध्याचे गुगल हँगआऊटची (ज्याला क्लासिक गुगल हँगआऊट म्हटले जाते) सेवा बंद केली जाईल.’

यानंतरही केलेल्या काही ट्विटमध्ये त्याने अर्धवट बातम्या देणाऱ्या वेबसाईटचा समाचार घेतला आहे. या ट्विटमध्ये स्कॉट म्हणतो, ‘तुम्ही तुमच्या बातमीमध्ये हँगआऊटचा उल्लेख ‘कंपन्यांसाठी देण्यात येणारी संपूर्णपणे वेगळी सेवा’ असा केला आहे. यावरूनच तुमचा टेक बाजारासंदर्भातील आणि आमच्या प्रोडक्टबद्दलचा कमी अभ्यास दिसून येतो. आमचे प्रोडक्ट हे ग्राहक, कंपन्या, शाळा, सरकारी संस्थाही वापरतात. आणि हे केवळ गुगलबद्दल आहे असे नाही तर संपूर्ण बाजारामध्ये अशापद्धतीने काम चालते. मॅसेंजरसारखे प्रोडक्ट हे कंपन्या आणि ग्राहक दोघांसाठी असतात मग ते फेसबुक मेसेंजर असो किंवा ड्रॉपबॉक्स. तरी मी माझ्या प्रोडक्टबद्दल सांगायचे झाले तर याबद्दल तुम्ही किंवा मी काहीही बोलून फायदा नाही कारण अंतीम निर्णय ग्राहकांचा असतो. मी सध्या इतकचं सांगेल’

कंपनीचे प्रवक्ते म्हणतात

नेटवरील चर्चांनतर अखेर गुगलच्या प्रवक्त्यांना एनगेज या वेबसाईटने संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात कंपनीची बाजू मांडली. कंपनीने अद्याप हँगआऊट बंद करण्यासंदर्भात कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही तरी असे झाल्यास युझर्सला गुगल चॅट किंवा मीटवर शिफ्ट केले जाईल. ‘आम्ही या आधीच गुगलचे क्लासिक हँगआऊटऐवजी गुगल चॅट आणि गुगल मीटला प्रमोट करण्याचा विचार करत आहोत. सध्या या दोन्ही सेवा जी सूट ग्राहकांना उपलब्ध असल्या तरी लवकरच सर्वांसाठी या सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मात्र गुगल क्लासिक हँगआऊटवरून युझर्सला चॅट आणि मीटवर कधी शिफ्ट करण्यात येईल यासंदर्भातील माहिती आम्ही अद्याप दिलेली नाही. तरीही जोपर्यंत क्लासिक हँगआऊटचे सर्व युझर्स यशस्वीपणे गुगल चॅट आणि मीटवर जात नाहीत तोपर्यंत ही सेवा बंद केली जाणार नाही हे आम्ही निश्चित सांगू शकतो असे गुगलचे प्रवक्ते ‘एनगेज’शी बोलताना म्हणाले.